Washim News : जऊळका शाळेचा Reality Check ; विद्यार्थ्यांचा भिंतीवर उड्या मारुन प्रवेश
Washim ZP School Reality Check : राज्यातील सर्व शाळा नियमित सुरू झाल्या असतानाच वाशिम जिल्ह्यातील जऊळका गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकशाही मराठीच्या टीमने आज सकाळी येथे रिअॅलिटी चेक केल्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील गंभीर स्थिती उघडकीस आली आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून अनेक विद्यार्थी पावसात भिजत शाळेच्या गेटबाहेर उभे होते. गेट बंद होता आणि तब्बल 35 मिनिटे तो तसाच राहिला. शाळेच्या गेटबाहेर पालक आणि विद्यार्थी उभे असून आत जायची वाट पाहत होते, पण कोणताही शिक्षक किंवा कर्मचारी त्या वेळेत शाळेत पोहोचलेला नव्हता.
अखेर काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या भिंतीवरून उड्या मारून शाळेच्या आवारात प्रवेश केला. ही परिस्थिती पाहून उपस्थित पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. शाळा प्रशासनाने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, रेल्वे गेटमुळे शिक्षकांना उशीर झाला. गेट बंद असल्याने ते वेळेत पोहोचू शकले नाहीत, मात्र यापुढे असं पुन्हा होणार नाही, याची हमी दिली जात आहे. पण प्रश्न असा आहे की, विद्यार्थी वेळेत पोहोचू शकले, तर शिक्षक का नाही? ३५ मिनिटे पावसात उभं राहणं ही केवळ मुलांची नव्हे तर पालकांचीही मानसिक व शारीरिक गैरसोय आहे. विशेष म्हणजे, या शाळेत सकाळच्या सत्रासाठी किमान दोन ते तीन शिक्षक कार्यरत असतात. मग याच दिवशी सर्वच शिक्षक अनुपस्थित का राहिले?
या सगळ्या घटनेवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत:
सर्व शिक्षक एकत्रच प्रवास करतात का?
रेल्वे गेटमुळे शिक्षक अडखळले, पण विद्यार्थी वेळेत पोहोचले, हे कसं?
हे वास्तव केवळ मीडियाच्या उपस्थितीमुळेच का समोर आलं?
यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत का?
या प्रश्नांवर प्रतिक्रिया देण्यासाठी लोकशाही मराठीने शिक्षणाधिकारी गजानन डामरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मान्य केलं की शिक्षक वेळेवर पोहोचणं आवश्यक होतं आणि उशीर झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली आहे. संबंधित शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून, याबाबत क्षेत्रीय यंत्रणांकडून अहवाल मागवण्यात आला आहे.डामरे यांनी स्पष्ट केलं की, अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
ही केवळ जऊळका गावातील घटना नसून, राज्यातील अनेक ग्रामीण शाळांमध्ये शिक्षक वेळेवर न पोहोचण्याची समस्या गंभीर आहे. शाळा वेळेवर सुरू होणं आणि शिक्षकांची उपस्थिती ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित बाब आहे. वेळेवर उपस्थित राहणाऱ्या चिमुकल्यांना त्यांचे शिक्षक आदर्श ठरावे, हीच अपेक्षा.