Dhule Crime : 'ते' फोटो व्हायरल होण्याच्या भीतीने 20 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
Shocking incident in Dhule : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ताजपुरी गावातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. बंटी ऊर्फ किशन जितेंद्र सनेर (वय 20 वर्षे) या तरुणाने मोबाईल हॅक झाल्याच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, किशन याच्या मोबाईलमध्ये एक APK फाईल इंस्टॉल करण्यात आली होती. संबंधित फाईलमुळे त्याचे WhatsApp हॅक झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, मोबाईलमधील काही आक्षेपार्ह फोटो गावातील व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर आणि काही मोबाईल नंबरवर व्हायरल झाल्याची भीती किशनला वाटत होती. या मानसिक तणावाखाली किशनने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या संदर्भात माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघन पाटील यांनी सांगितले की, मोबाईलमध्ये आढळून आलेली APK फाईल संशयास्पद असून, पुढील सायबर तपास सुरू आहे. किशन हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, किशनच्या आत्महत्येने परिसरात शोककळा पसरली आहे.
या निमित्ताने पोलीस प्रशासनाकडून युवकांना आवाहन करण्यात येत आहे की, मोबाईलमधील अज्ञात फाईल्स डाउनलोड करण्यापूर्वी सतर्कता बाळगा व सोशल मिडियावरील गोष्टींचा विचारपूर्वक वापर करा. अशा घटनांची माहिती त्वरित पोलिसांशी शेअर करावी.