Chhatrapati Sambhajinagar : घाटी रुग्णालयाचा ढिसाळ कारभार, गरोदर महिलेची रस्त्यावर प्रसूती
छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध घाटी रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका गरोदर महिलेला दाखल करून न घेतल्याने तिने रस्त्यावरच प्रसूती करण्यात आली. महिलेच्या नातेवाईकांनी हा गंभीर आरोप केला आहे. शनिवारी (२४ मे) सायंकाळी ही घटना वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयासमोर घडली. या प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
प्रसूतीसाठी महिला आपल्या नातेवाइकांसह घाटी रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र, तिला कोणत्याही विभागात स्वीकारले गेले नाही. एका विभागातून दुसऱ्या विभागात तिला फिरवण्यात आले. अखेर नाईलाजाने रुग्णालयाच्या आवारातच, अधीक्षकांच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर तिची प्रसूती झाली असे नातेवाईकांनी सांगितले. बाळ जन्मल्यानंतर काहीवेळ हालचाल करत नव्हते. नातेवाइक महिलेने बाळाला हातात घेत रुग्ण महिलेची काळजी घेतली. यावेळी स्त्रीरोग विभागातील डॉक्टरांनी धाव घेतली व तिला विभागात दाखल करून घेण्यास सांगितले. मात्र, संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातील दुर्दशेवर नाराजी व्यक्त केली "दवाखाना आहे की काय?" अशी संतप्त प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व छायाचित्रे काही उपस्थितांनी काढली असून ती सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या प्रकारामुळे वैद्यकीय सेवांची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. या प्रकारामुळे रुग्णालयातील व्यवस्थेची गडबड स्पष्ट झाली असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.