Pune : किडनी रॅकेट प्रकरणात मोठा खुलासा, डॉ. अजय तावरे सहआरोपी

Pune : किडनी रॅकेट प्रकरणात मोठा खुलासा, डॉ. अजय तावरे सहआरोपी

पुणे किडनी रॅकेट: डॉ. अजय तावरेचा थेट सहभाग उघड, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ.
Published by :
Team Lokshahi
Published on

पुण्यात 2022 साली उघडकीस आलेल्या रुबी हॉल किडनी रॅकेट प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांचा या रॅकेटमध्ये थेट सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सुरुवातीला कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. परंतु डॉ. तावरे यांचे नाव त्यावेळी एफआयआरमध्ये नव्हते. त्यांनी आपले नाव यादीतून वगळण्यात यश मिळवले होते. मात्र, अलीकडेच पोर्शे अपघात प्रकरणात त्यांना अटक झाल्यानंतर, पोलिसांनी त्यांच्या विरोधातील जुने प्रकरण पुन्हा उघडले. त्यात किडनी रॅकेट प्रकरणाची फेर तपासणी करण्यात आली. त्यामधून सहभाग असल्याचे सिद्ध झाले.

किडनी रॅकेटच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने 2022 मध्येच तावरे याच्यावर संशय व्यक्त केला होता. ही समिती एका निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत होती. त्यांच्या अहवालात डॉ. तावरे यांनी रिजनल ऑथरायझेशन कमिटीचे अध्यक्ष म्हणून बनावट कागदपत्रांना मान्यता दिली असल्याचे नमूद करण्यात आले होते. तपासात असेही समोर आले आहे की, डॉ. तावरे यांनी किडनी देणाऱ्यांचे आणि बनावट कागदपत्रे वैध असल्याचे दाखवले. त्यांनीच सर्व प्रक्रिया मंजूर करून दिली होती. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे एका मुख्य सूत्रधाराच्या नजरेने पाहिले जात आहे.

सध्या डॉ. तावरे हा येरवडा कारागृहात पोर्शे प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, गुन्हे शाखा आता त्यांच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. लवकरच त्यांच्या विरोधात किडनी रॅकेट प्रकरणात स्वतंत्र आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. या नव्या घडामोडीमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, अधिक तपशील लवकरच उघड होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com