Eknath Khadse : खडसेंच्या मागची साडेसाती थांबेना; लेकीनंतर आता खडसेंच्या घरी चोरी
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील शिवराम नगर येथील निवासस्थानी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सहा ते सात तोळे सोनं आणि 35 हजार रुपये असा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
घटनेची माहिती अशी की, एकनाथ खडसे सध्या मुक्ताईनगर येथे राहत आहेत. त्यामुळे जळगावातील ‘मुक्ताई बंगला’ काही दिवसांपासून बंद होता. सकाळी कर्मचाऱ्याने बंगल्याची पाहणी करण्यासाठी भेट दिली असता, घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. त्यानंतर कर्मचाऱ्याने खडसे यांना आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि तपास सुरू केला आहे.
एकनाथ खडसे यांनी सांगितले की,“रात्री घरफोडी झालेली आहे. सर्व खोल्यांचे कुलूप तोडले गेले आहेत. माझ्या खोलीत 35 हजार रुपये आणि चार सोन्याच्या अंगठ्या होत्या. खाली नातेवाईकांच्या रूममधूनही पाच तोळे सोनं चोरीला गेलं आहे. पोलिसांचा जिल्ह्यात धाक राहिलेला नाही. चोऱ्या, दरोडे सतत होत आहेत, पण प्रशासन गांभीर्याने घेत नाही.”

