Parbhani Accident News : लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; 9 जण गंभीर जखमी
लग्नाला घेऊन जाणारा वऱ्हाडाची गाडी उलटली. ही घटना औंढा नागनाथजवळ शनिवारी सकाळी घडली. जखमींवर हिंगोली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळी साडे नऊच्या सुमारास येहळेगाव सोळंके (ता. औंढा नागनाथ) येथून दुधगाव (जि. परभणी) येथे लग्नासाठी वऱ्हाड निघाले होते. पीकअप वाहनामधून जात असलेल्या वऱ्हाडी गाडी औंढा नागनाथपासून काही अंतरावर खांडेश्वरी मंदिराजवळ वळणावर दुर्दैवी घटना घडली. समोरून आलेल्या भरधाव एर्टीगा कारने अचानक कट मारल्याने वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि पीकअप रस्त्याच्या बाजूला उलटली.
हा अपघात एवढा भीषण होता की, वाहनात बसलेले सर्वजण एकमेकांवर आदळले. यात समाधान सोळंके, फेरोज शेख, गणेश सोळंके, गंगाधर लढाड, संदू मुदनर, प्रयागबाई कदम, राजेश सोळंके, सोनाजी सोळंके, तसेच चालक अंकुश इंगोले हे गंभीर जखमी झाले. अन्य काहींना किरकोळ जखमी झाले असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
या अपघाताची माहिती मिळताच औंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी पोहोचले. जमादार ज्ञानेश्वर गोरे, रवीकांत हरकाळ, संदीप टाक यांच्यासह पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिका आणि खाजगी वाहनांद्वारे तातडीने उपचारासाठी हलवले.