Panvel : पनवेलमध्ये उभारणार विज्ञानप्रेमींसाठी अद्वितीय अंतराळ संग्रहालय
पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून खारघर परिसरात विज्ञान व अंतराळ तंत्रज्ञान यावर आधारित एक अद्वितीय ‘अंतराळ संग्रहालय’ साकारले जाणार आहे. मुंबईतील तारांगणाचा आदर्श घेऊन साकार होणाऱ्या या प्रकल्पाला नुकतीच प्रशासनाची आणि आर्थिक मंजुरी मिळालेली आहे. महापालिका आयुक्त मंगेश चितळे आणि अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांच्या पुढाकाराने या प्रकल्पाला गती मिळाली असून सुमारे 41 कोटी रुपयांचा खर्च यासाठी करण्यात येणार आहे.
हा प्रकल्प खारघरमधील सेक्टर 35 (H) मधील 23,262.61 चौ. मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर उभारण्यात येणार आहे. हा भूखंड सिडकोकडून महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि अंतराळ संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी हे संग्रहालय उपयुक्त ठरेल. याशिवाय, नागरिकांनाही भारताच्या अंतराळ मोहिमा, यशोगाथा आणि संशोधनाबाबत माहिती देणारा हा उपक्रम ठरेल.
या प्रकल्पासाठी N.T.T. सल्लागार संस्था नियुक्त करण्यात आली असून, संपूर्ण आराखडा, अंदाजपत्रक आणि कामांची देखरेख यांचं नियोजन ती करणार आहे. संग्रहालयाच्या प्रस्तावित इमारतीचं एकूण क्षेत्रफळ 3,485.10 चौ. मीटर असणार आहे. विशेष म्हणजे, या इमारतीचा काही भाग सौर ऊर्जेवर आधारित असणार आहे, तर संपूर्ण इमारत सीसीटीव्ही अंतर्गत सुरक्षीत असेल.
या संग्रहालयात काय असेल खास?
विज्ञान आणि अंतराळ विषयांवरील विविध प्रदर्शने
विद्यार्थ्यांसाठी 120 आसन क्षमतेचा बहुउद्देशीय हॉल
मोठ्या कार्यक्रमांसाठी 220 आसन क्षमतेचा मुख्य हॉल
पनवेलमध्ये शिक्षणसंस्था व विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असून, त्यांच्यासाठी हे संग्रहालय एक प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण स्थळ ठरणार आहे. भविष्यातील वैज्ञानिक पिढी घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.