Mira Road MNS Morcha : "महाराष्ट्रात सर्वांना मराठी आलीच पाहिजे", मनसेच्या मोर्चात चिमुकल्याची घोषणा
मनसेतर्फे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आज मीरा रोड येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये मनसेचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मोर्चाचे वैशिष्ट्य ठरला तो एका चिमुकल्याचा उत्साह, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सहभागी झाला होता.
हा चिमुकला सध्या सेंट कॉमर्स हायस्कूलमध्ये सहावीत शिक्षण घेत आहे. तो मुलगा म्हणाला की, "मी माझ्या इच्छेने या मोर्चात सहभागी झालो आहे. महाराष्ट्रात प्रत्येकाने मराठी भाषा अभिमानाने बोलली पाहिजे," असे ठाम मत त्याने व्यक्त केले. त्याचे आत्मविश्वासपूर्ण बोलणे आणि मराठीबद्दलची भावना उपस्थित सर्वांच्या काळजाला भिडली.
मोर्चादरम्यान "आस्ते कदम... आस्ते कदम... महाराज!" च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. "गडपती, भूपती, प्रजापती... सुवर्णरक्त श्रीपती... अष्टावधान जागृत, अष्टप्रधान दैष्टीत..." या जोशपूर्ण घोषणांनी शिवप्रेम जागवले. "हर हर महादेव" आणि "महाराजांचा विजय असो" या घोषणांमधून मराठी जनतेच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेले प्रेम पुन्हा एकदा दिसून आले. मनसेच्या या उपक्रमातून मराठी भाषेबद्दल जनजागृतीचा उद्देश साधण्यात आला असून, लहान वयातच एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवरायांची ओळख व मराठी भाषेचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित केले, हे विशेष लक्षवेधी ठरले.