भाईगिरी अंगलट! कमरेला बंदूक, पोलिसांच्या गाडीसमोर रील शूट; तरुणावर गुन्हा दाखल

भाईगिरी अंगलट! कमरेला बंदूक, पोलिसांच्या गाडीसमोर रील शूट; तरुणावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला असून, एका तरुणाने थेट पोलिसांच्या गाडीसमोर उभा राहत कमरेला बंदूक लावून इंस्टाग्रामसाठी रिल तयार केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

सोशल मीडियावर काहीतरी हटके करून ‘व्हायरल’ होण्याची स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, त्यातच काही तरुण कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन समाजात भीती पसरवणारे कृत्य करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला असून, एका तरुणाने थेट पोलिसांच्या गाडीसमोर उभा राहत कमरेला बंदूक लावून इंस्टाग्रामसाठी रिल तयार केली आहे. या प्रकारामुळे संबंधित तरुणाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

"हम जैसे लोगों के क्रश नही, केस होते हैं मिस्टर", या कॅप्शनसह पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये आर्तफ पटेल नावाचा तरुण दिसून येतो. व्हिडिओमध्ये तो पोलिसांच्या गाडीचा दरवाजा उघडत असून, कमरेला बंदूक अडकवलेली दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि लगेचच पोलीस यंत्रणा सजग झाली.

या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, समाजात भीती पसरवण्याचा प्रयत्न झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी भूषण काशिनाथ राऊत यांनी याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, भारतीय दंड विधानातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तरुणाने जाणूनबुजून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून, "मी खूप मोठा भाई आहे" हे दाखवण्यासाठी पोलिसांनाही अप्रत्यक्ष आव्हान दिले आहे. कमरेला शस्त्र लावून थेट पोलिसांच्या वाहनासमोर व्हिडिओ शूट करणे, हे अत्यंत गंभीर प्रकरण मानले जात आहे. या प्रकरणाचा तपास हर्सूल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पागोटे करत आहेत. पोलिसांकडून व्हिडिओची सत्यता आणि शस्त्र वास्तविक आहे की नाही, याची चौकशी सुरू असून, संबंधित तरुणावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

फक्त काही सेकंदांच्या व्हिडिओसाठी कायद्याची पायमल्ली आणि समाजात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणे तरुणांच्या भविष्यावर गहिरे परिणाम करू शकते. सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होण्यापेक्षा जबाबदारीने वागणे ही काळाची गरज बनली आहे. अशा प्रकारचे कृत्य केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर समाजासाठीही घातक ठरू शकते.

छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारी क्षेत्रात काही तरुणांना जाण्याची इच्छा असल्याने हे गुन्हेगारी क्षेत्रातील तरुण राजरोजपणे हातात तलवार, चाकू, कोयता, बंदूक आणि इतर शस्त्र व्हिडिओ बनवतात. यामुळे दहशत निर्माण होते आणि गुन्हेगारी ही वाढते. या गुन्हेगारांना पाहून इतर गुन्हेगारसुद्धा असे व्हिडिओ बनवतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com