Crime : निढोरीतील युवकाला गजाने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल, आरोपींना अटक
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात निढोरी येथील 24 वर्षीय युवकावर झालेल्या मारहाणीची गंभीर घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीवरून, प्रेमसंबंधातील वादातून तीन व्यक्तींनी संबंधित युवकाला निर्जन स्थळी नेऊन त्याच्यावर अमानुष हल्ला केला. ही घटना मुरगूड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडली असून, सौरभ भरमा कांबळे असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संशयितांनी पीडिताला मुरगूड नाका परिसरातून गाडीमध्ये जबरदस्तीने नेऊन कुरणी गावाजवळील एका शेडमध्ये विवस्त्र करून लाठी, लोखंडी गज आणि लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. या प्रकारात पीडित मुलाचा मोबाईल व्हिडिओ तयार करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे. पीडिताने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर पुन्हा पकडून आणून त्याच ठिकाणी मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. घटनेनंतर काही स्थानिक ग्रामस्थांनी वेळेवर हस्तक्षेप करत पीडिताला मदत केली.
याप्रकरणी मुरगूड पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवून अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. पोलीस प्रशासन या प्रकाराकडे गांभीर्याने पाहत असून, संबंधितांवर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाणार आहे.