Aamir Khan With Rajkumar Hirani : 'या' दिग्गजाच्या बायोपिकसाठी आमिर खान आणि राजकुमार हिराणी आले एकत्र
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणारा दिग्दर्शक राजकुमार हिराणी पुन्हा एकदा एका खास प्रोजेक्टसाठी एकत्र येणार आहेत. यापूर्वी या जोडगोळीने 'पीके' आमि '3 इडियट्स' सारखे चित्रपट प्रेक्षकांना दिले. आता हे दोघे मिळून दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. त्यामुळे तब्बल 11 वर्षानंतर ही अभिनेता-दिग्दर्शक जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
राजकुमार हिराणी यांनी 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि 'लगे रहो मुन्नाभाई'सारखे कॉमेडीसोबतच लोकांच प्रबोधन करणारे चित्रपट बनवल्यानंतर त्यांचा '3 इडियट्स' हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात आमिर खानने पहिल्यांदा राजकुमार हिराणीसोबत काम केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला असून आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. पुढे 2014 साली राजकुमार हिराणीच्या 'पीके' चित्रपटात पुन्हा एकदा आमिर खान दिसून आला. हा चित्रपटदेखील प्रेक्षकांना खूप भावला. सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटासाठी आमिर खान आणि राजकुमार हिराणी पुन्हा एकदा एकत्र येणार असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतील, हे नक्की.