मोठा निर्णय: रायगडात अदिती, बीडमध्ये अजितदादा, नाशिकचाही खेळ फिक्स!
मोठा निर्णय: रायगडात अदिती, बीडमध्ये अजितदादा, नाशिकचाही खेळ फिक्स!मोठा निर्णय: रायगडात अदिती, बीडमध्ये अजितदादा, नाशिकचाही खेळ फिक्स!

मोठा निर्णय: रायगडात अदिती, बीडमध्ये अजितदादा, नाशिकचाही खेळ फिक्स!

रायगड निर्णय: अदिती तटकरे, बीडमध्ये अजित पवार, नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची जबाबदारी निश्चित.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यातील रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांतील पालकमंत्रीपदाच्या तिढ्याला अखेर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘तात्पुरता’ तोडगा निघाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या ३४ जिल्ह्यांच्या ध्वजारोहण यादीत रायगडमधील झेंडावंदनाची जबाबदारी अदिती तटकरे, नाशिकमध्ये गिरीश महाजन तर बीडमध्ये अजित पवार यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. रायगडमध्ये अदिती तटकरे विरुद्ध भरत गोगावले आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन विरुद्ध दादा भुसे असा पालकमंत्रीपदाचा संघर्ष गेल्या अनेक महिन्यांपासून महायुतीच्या डोक्याला काळजी ठरत होता. जानेवारीत झालेल्या नियुक्त्या दुसऱ्याच दिवशी रद्द होत, दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी ‘स्थगित’ ठेवण्यात आली. अखेर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमापुरता का होईना, पण ‘शांती तह’ झाला आहे.

भरत गोगावले यांनी अलीकडेच घेतलेली सौम्य भूमिका “तिढा सुटला तर ठीक, नाहीतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो मान्य”—यामुळे तडजोडीचा मार्ग खुला झाला असावा, अशी राजकीय वर्तुळातील कुजबुज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अदिती तटकरे यांना, तर शिवसेना भरत गोगावले यांना रायगडची जबाबदारी मिळावी, यावर ठाम होती. मात्र यादीत अदिती तटकरे यांचेच नाव आल्याने किमान १५ ऑगस्टपुरता वाद शमला आहे. दरम्यान, बीडमध्ये अजित पवार हे स्वातंत्र्यदिनाचे झेंडावंदन करणार असून, पुण्यातील मुख्य शासकीय सोहळा राज्यपालांच्या हस्ते पार पडणार आहे. पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिला बीड दौरा असल्याने, तसेच अलीकडेच विकासाची हमी आणि गुन्हेगारांना इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. रायगड, नाशिक आणि बीड—या तिन्ही जिल्ह्यांतील १५ ऑगस्ट सोहळे यंदा फक्त स्वातंत्र्याचा उत्सव नाही, तर राजकीय समीकरणांचा सूचक आरसा ठरणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com