Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."
आज मुंबईतील वरळी येथील डोम सभागृहात राज-उद्धव विजयी मेळावा पार पडला. 20 वर्षांनंतर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एका मंचावर पाहायला मिळाले. यादरम्यान अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. याचपार्श्वभूमिवर उदय सामंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मराठीच्या नावावर केलेला विजयी मेळावा हा राजकीय मेळावा होता. मनसेनं सोबत घ्यावं म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेची घाई आज पाहायला मिळाली. असं म्हणत, मंत्री उदय सामंतांनी ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर टीका केली आहे.
तर पुढे उदय सामंत म्हणाले की, "एक भाषण मराठीच्या कल्याणासाठी होतं. तर दुसऱ्याच भाषण फक्त सत्तेच होतं महाराष्ट्रात कशी सत्ता येईल मुंबईमध्ये कशी सत्ता येईल या हव्यासापोटी केलेलं भाषण होतं. राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये कुठेही आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढणार म्हटलेलं नसताना, युत्या करण्यापेक्षा आघाडी करण्यापेक्षा मराठीसाठी एकत्र येण गरजेचे आहे. आजचा मेळावा फक्त मराठीपूर्ती मर्यादित होता".
"दुसऱ्या भाषणात फक्त हेटाळणी, बदनामी, शिव्या तर केंद्र सरकारवर आगपाखड एकनाथ शिंदे आणि फडणवीसांवर टीका होती. परिपक्व राजकारणी कसा असतो हे देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलं आहे. दोन भाऊ एकत्र आले तर ते परम भाग्य आहे. आजच्या मेळाव्यात मराठीचं नाव ठेऊन अनेकांनी आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. राज साहेबांच्या भाषणामध्ये कुठेही एकत्र येण्याचा मुद्दा पुढे आला नाही. आजचा मेळावा झाला म्हणजे युती झाली असं नाही". असं उदय सामंत म्हणाले आहेत.