Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया
MP Sanjay Raut's first Reaction After Vijayi Melava : हिंदी सक्तीविरोधात राज आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली. “आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी,” असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युतीचे संकेत दिले. वरळीतील मेळाव्यात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांवर टोला लगावत म्हटले की, “जे बाळासाहेबांना जमले नाही ते फडणवीसांना जमले.”
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “सिंहासन खाली करा, ठाकरे येत आहेत.” त्यांनी भाजप आणि त्यांच्या नेतृत्वावर टीका करताना म्हटले की, “हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे आहेत. शिंदे-राणे यांना मोदी-शहा चालवत आहेत.” राऊतांनी भाजपचा मुंबईवरील दावा फोल ठरवला असल्याचे सांगत म्हटले, “भाजप कधीच मुंबई मिळवू शकणार नाही.”
राऊत पुढे म्हणाले की, “मी आणि राज ठाकरे यांच्यात संवाद कायम होता. राजकारणात मतभेद असूनही संवाद आवश्यक असतो.” मराठीसाठी उभं राहण्याचा निर्धार करत, “आम्ही मराठीसाठी लढलो आणि लढणार,” असेही त्यांनी स्पष्ट केलं. ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यामुळे राज्यातील विरोधकांची भुवया उंचावल्या असून, आगामी निवडणुकीत या युतीचा मोठा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे.