Manoj Jarange Patil Azad Maidan : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात आंदोलन तीव्र
Manoj Jarange Patil Azad Maidan : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात आंदोलन तीव्र; सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडीManoj Jarange Patil Azad Maidan : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात आंदोलन तीव्र; सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी

Manoj Jarange Patil Azad Maidan : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात आंदोलन तीव्र; सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी

मराठा आरक्षण आंदोलन: आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तीव्र, सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Manoj Jarange Patil Azad Maidan : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंदोलनाचा स्वर अधिक तीव्र झाला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरात शनिवारी सकाळपासून आंदोलक आक्रमक झाले असून रस्त्याच्या मधोमध शेगडी पेटवून पोहे बनवण्याचा प्रकार घडला. यामुळे संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी झाली असून प्रशासनाला रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) तैनात करावे लागले आहे.

पावसामुळे हाल, अन्न-पाण्याचा प्रश्न गंभीर

शुक्रवारीपासून मुंबईत मुसळधार पावसामुळे आझाद मैदानात ठाण मांडलेल्या हजारो मराठा आंदोलकांचे हाल झाले. पिण्याचे पाणी, शौचालयातील पाणी तसेच निवाऱ्याची कुठलीही ठोस व्यवस्था न झाल्यामुळे आंदोलकांमध्ये नाराजी होती. त्यातच प्रशासनाने सीएसएमटी परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. परिणामी आंदोलक काल दिवसभर उपाशी राहिले. अनेकांनी रात्रभर सीएसएमटी स्थानकातच मुक्काम केला.

रस्त्यावर शेगडी, पोह्यांची सोय

सकाळी जेवणाचा कुठलाही पर्याय नसल्याने आंदोलक संतप्त झाले आणि सीएसएमटी स्थानकाबाहेरील रस्त्यावरच शेगडी पेटवून पोहे बनवायला सुरुवात केली. रस्त्याच्या मधोमध सुरू झालेल्या या हालचालींमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. अनेक BEST बसेस आणि टॅक्सी तासन्‌तास अडकून पडल्या. त्याचवेळी परभणीहून आलेल्या एका मराठा बांधवाने आपल्या टेम्पोतून नाश्त्याची सोय केली. आंदोलकांना चहा, पोहे आणि केळी वाटण्यात आली.

पोलिसांचे प्रयत्न आणि आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

मुंबई पोलिसांचे डीसीपी प्रवीण मुंडे यांनी आंदोलकांशी संवाद साधून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी सीएसएमटी परिसरातच ठाण मांडले. काही आंदोलकांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आंघोळ केली तर काहींनी बसवर चढून निदर्शने केली. परिणामी परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

प्रशासनाचे पुढचे पाऊल

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने रॅपिड अॅक्शन फोर्स तसेच CRPF जवानांची तुकडी तैनात केली आहे. आंदोलकांना रस्त्यावरून हटवण्यासाठी कठोर पावले उचलावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

आंदोलनाचे स्वर तीव्र होण्याची शक्यता

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन पुढील काही दिवस मुंबईत आणखी तीव्र होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. आझाद मैदानात उपोषण सुरु असतानाच, परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत. प्रशासनाने सुविधा न पुरवल्यामुळे आंदोलकांमध्ये संताप वाढत असून संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com