Agniveer Recruitment : अग्निवीरांसाठी सुवर्णसंधी: 75% जणांना सैन्यात कायमस्वरूपी नोकरीची शक्यता
भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अग्निवीरांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत केवळ 25 टक्के अग्निवीरांना सैन्यात कायमस्वरूपी नोकरीची संधी दिली जात होती, परंतु आता हे प्रमाण वाढवून 75 टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स आज जैसलमेर येथे सुरू झाली असून, या प्रस्तावावर निर्णायक चर्चा होणार आहे.
सध्या अग्निवीरांचा रिटेन्शन रेट म्हणजेच कायम ठेवण्याचे प्रमाण 25 टक्के आहे. नव्या प्रस्तावानुसार, 100 पैकी 75 अग्निवीरांना सैन्यात नियमित पदावर नोकरी दिली जाईल. या परिषदेत तिन्ही संरक्षण सेवांमधील एकता वाढवण्याचे उपाय आणि ‘मिशन सुदर्शन चक्र’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, हे महत्त्वाचे विषय आहेत. तसेच, अग्निवीर प्रस्तावालाही मंजुरी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अग्निवीरांची पहिली तुकडी पुढील वर्षी आपला चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्तावही अजेंड्यावर आहे. मे महिन्यात झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतरची ही पहिली आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स आहे.
ही परिषद लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्वासाठी देशाच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरते. याशिवाय, वाढत्या माजी सैनिकांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा उपयोग कसा करता येईल, यावरही विचार सुरू आहे. सध्या ते आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी आणि ईसीएचएस पॉलीक्लिनिक सारख्या मर्यादित जबाबदाऱ्या सांभाळतात; मात्र त्यांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच, सेवारत सैनिकांच्या कल्याण आणि कार्मिक विषयांवर देखील सखोल चर्चा अपेक्षित आहे.


