Ahmedabad Plane Crash : 242 प्रवाशांचा मृत्यू, नागपूरच्या कुटुंबावर काळाचा घाला!
अहमदाबादमध्ये घडलेल्या एअर इंडिया विमान अपघातात 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दु:खद माहिती समोर आली आहे. या अपघातातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील अनेक प्रवाशांचा समावेश आहे, त्यात नागपूरच्या एका कुटुंबातील तीन सदस्यांचाही समावेश आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये यशा कामदार, त्यांचा मुलगा रुद्र कामदार, आणि सासू रक्षा मोढा यांचा समावेश आहे. हे तिघेही नागपूरच्या क्वेटा कॉलनीत राहणारे होते. हे सर्वजण लंडनला त्यांच्या सासऱ्यांच्या शोकसभेसाठी निघाले होते, ज्यांचे अलीकडेच कॅन्सरमुळे निधन झाले होते.
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “यशा कामदार यांचे सासरे लंडनमध्ये व्यवसाय करत होते. उपचारासाठी अहमदाबादला आले होते. तेथेच कॅन्सरच्या उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्याच ओळखीतील लोकांनी लंडनमध्ये शोकसभा आयोजित केली होती. कामदार कुटुंब त्या शोकसभेसाठी निघाले होते.” या अपघाताची माहिती मिळताच कामदार कुटुंबीय दुपारी ३ वाजता अहमदाबादकडे रवाना झाले.
महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू
या अपघातात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. यामध्ये ३ प्रवासी आणि ३ केबिन क्रू सदस्य होते. मृत केबिन क्रू सदस्यांमध्ये अपर्णा महाडिक, मैथिली पाटील, आणि रोशनी राजेंद्र सोनघरे यांचा समावेश आहे. त्या अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या विमानात कार्यरत होत्या.