Air India Plane Crash : ब्लॅक बॉक्सचा डेटा झाला डाउनलोड; अपघाताचा घटनाक्रम उघड होणार ?, 275 जणांच्या मृत्यूचं कारण समजणार
अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलायनर 787 विमानाचा 12 जून रोजी भीषण अपघात झाला होता. टेकऑफनंतर अवघ्या काही सेकंदातच विमान कोसळले. या दुर्घटनेत एकूण 275 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 230 प्रवासी, 12 कर्मचारी आणि जमिनीवरचे 34 नागरिक यांचा समावेश होता. फक्त एक प्रवासी या अपघातातून बचावला.
या अपघाताच्या चौकशीत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षितरीत्या हस्तगत करण्यात आला असून त्यातील कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) यातील माहिती मिळवण्यात यश आलं आहे. 24 जून रोजी हा ब्लॅक बॉक्स अहमदाबादहून दिल्लीला आणण्यात आला. तसेच एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (AAIB) त्याचा तपास सुरू केला आहे.
सीव्हीआरमधून वैमानिकांमधील शेवटचे संभाषण, तसेच कॉकपिटमधील आवाज टिपले गेले आहेत. एफडीआरमध्ये विमानाचा वेग, उंची, दिशा, इंजिनची स्थिती यासारख्या तांत्रिक बाबींची नोंद आहे.
ही माहिती सखोलपणे तपासली जात असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये यांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा इतर कोणतेही संभाव्य कारण समाविष्ट आहे का, हे पाहिलं जात आहे. हवाई सुरक्षेला बळकटी देण्यासाठी ही चौकशी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.