Pune ZP : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-शिवसेना थेट लढत; राजकीय हालचालींना वेग
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. येथील लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-शिवसेना अशी थेट होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पुण्यात राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून मोठ्या संख्येने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. काही तालुक्यांत दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची शक्यता असून, काही ठिकाणी स्वतंत्र लढत होऊ शकते, असे संकेत देण्यात आले आहेत.
दुसरीकडे भाजपनेही ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करत उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. अनुभवी आणि स्थानिक पातळीवर मजबूत उमेदवारांवर भर दिला जात आहे. भाजप शिवसेनेसह युती करून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. एकूणच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण राजकारण तापू लागले असून, येत्या काही दिवसांत युती आणि उमेदवारांची चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार, हे निश्चित आहे.

