Sunil Tatkare : "अजित पवार मुख्यमंत्री..." सुनील तटकरे मोठं विधान
Sunil Tatkare On Ajit Pawar : "अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, ही आमची इच्छा आहेच, पण एवढ्यावरच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचीही हीच भावना आहे," असे खळबळजनक आणि स्पष्ट विधान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
या मेळाव्यात बोलताना तटकरे यांनी अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीचा गौरव करत अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे अधोरेखित केले. "राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची संकल्पना १९७८ साली पुलोद सरकारच्या काळात अस्तित्वात आली. मात्र, या पदावर सर्वाधिक वेळा विराजमान होण्याचा मान केवळ अजित पवार यांनाच मिळाला आहे. एवढंच नाही, तर राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या बाबतीतही विक्रमी कामगिरी त्यांच्याच नावे आहे," असे सांगत त्यांनी अजित पवार यांच्या प्रशासनातील अनुभवावर भर दिला.
तटकरे पुढे म्हणाले, "जसा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणे कठीण आहे, तसाच दादांचा (अजित पवारांचा) उपमुख्यमंत्रिपदाचा आणि अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोडणे अशक्यप्राय आहे. यात कुणालाही शंका असण्याचे कारण नाही. पण याचा अर्थ असा नाही की ते केवळ उपमुख्यमंत्रिपदापुरतेच सीमित आहेत."
तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "राज्यातील जनतेच्या मनातदेखील अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी तीव्र अपेक्षा आहे. आमच्या सगळ्यांच्याच मनात ही इच्छा आहे. मात्र आम्ही केवळ भावनेतून बोलत नाही. राजकारण ही संख्या, आकड्यांची खेळी असते. वास्तववादी विचार करत, जनतेच्या अपेक्षा लक्षात घेत आम्ही पुढे जात आहोत."
राजकारणात अजित पवार यांचे स्थान हे केवळ पदांपुरते मर्यादित नसून, त्यांच्या कठोर परिश्रमांची, दूरदृष्टीची आणि कार्यक्षमतेची दखल राज्यभर घेतली जात आहे, असे सांगताना तटकरे म्हणाले, "दादांचे नेतृत्व म्हणजे नुसते बोलणे नाही, तर अहोरात्र कष्ट करून जनतेसाठी निर्णय घेणारा नेता. त्यांच्या विचारसरणीला आणि दृष्टिकोनाला महाराष्ट्रात पर्याय नाही."
अशा स्पष्ट आणि ठाम विधानांमुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मुख्यमंत्रीपदाबाबतची भूमिका अधिक ठळक झाली असून, आगामी काळात राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चिन्हे निर्माण होताना दिसत आहेत. सुनील तटकरे यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरून चर्चेला सुरुवात झाली आहे.