'अजित पवार गौतमी पाटील कशी नाचते यापेक्षा नीरा नदी कशी वाचेल याकडे लक्ष द्या'
Admin

'अजित पवार गौतमी पाटील कशी नाचते यापेक्षा नीरा नदी कशी वाचेल याकडे लक्ष द्या'

नीरा नदी काठील शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
Published by :
Siddhi Naringrekar

विकास कोकरे, बारामती

बारामती व फलटण तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या नीरा नदीत माळेगाव कारखान्यातील रसायनमिश्रित सांडपाणी सोडण्यात आल्याने प्रदूषणाने कळस गाठला आहे. या प्रकल्पातील रसायन मिश्रित सांडपाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करताच थेट ओढ्याद्वारे निरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सोडले जाते. यामुळे नदी काठच्या नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. शेतातील पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने या गोष्टीकडे लक्ष द्यायला अजित पवारांना वेळ नसून,अजित पवार गौतमी पाटील कशी नाचते यापेक्षा नीरा नदी कशी वाचेल याकडे आपण लक्ष द्यावे.अशा प्रकारचा नीरा नदी काठील शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

बारामती तालुक्यातील खांडज २२ फाटा येथील युवा शेतकरी मिथुन आटोळे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, तालुक्यात या व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. नीरा नदीने अनेकांच्या अंतयात्रा बघितल्या मात्र आज याच निरामातेला स्वतःची अंत्ययात्रा बघण्याची वेळ आलेली असून,याला केवळ माळेगाव कारखान्याचे संचालक मंडळ आणि विरोधी पक्षनेते अजित पवार जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी मिथुन आटोळे यांनी केलाय. अजित पवारांनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचार सभेवेळी नीरा नदीकाठील लोकांना शब्द दिला होता.मात्र अजित पवारांना त्यांचा शब्दाचा विसर पडला की काय ? असा सवाल देखील आटोळे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निरा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आटोळे यांनी केली आहे.

आम्ही कारखान्याच्या पाठीमागे राहत असून काठी कारखान्याच्या पाठीमागे माझी विहीर असून,गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून माळेगाव कारखान्याला वारंवार पत्रव्यवहार करत असून,कारखाना प्रशासनाने अद्यापही आमच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. या पाण्याचा आमच्या शेतीवर एवढा मोठा परिणाम होतो की कारखाना सुरू झाल्यावर आमच्या शेतीचे एकरी उत्पन्न ८० टणांपेक्षा जास्त निघत होते,मात्र आता या प्रदूषित पाण्यामुळे एकरी उत्पन्न ४० टनांपेक्षा देखील कमी होत आहे. माळेगाव कारखान्याने साठवलेल्या मळीचे पाणी देखील आमच्या विहिरीत उतरत असल्याने शेतांमध्ये उत्पन्न घेऊ वाटत नाही अशी अवस्था आमची झालीये.

माळेगाव कारखान्याचे दूषित पाणी निरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोडले जाते. त्यामुळे नीरा नदीची भयानक अवस्था झाली आहे.गेल्या काही वर्षांपासून सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघाचे करत असून,याच बारामती तालुक्यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. यामुळे सुळे यांनी तात्काळ या गोष्टीकडे लक्ष घालून माळेगाव कारखाना संचालक मंडळाला तात्काळ सूचना कराव्यात,अन्यथा येत्या काही दिवसात शिवसेना मोठे जन आंदोलन उभारले असा ईशारा शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी दिला.

यामुळे आता तरी शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणारे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार याकडे लक्ष देऊन नीरा मातेला प्रदूषणमुक्त व नीरा नदीकाठी राहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देत, माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सभासदांना दिलेला शब्द पाळणार का ? हे पाहणं देखील आता महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com