Ajit Pawar On Suryakumar Yadav
Ajit Pawar SpeechLokshahi

"...तर आम्ही सर्वांनी तुला बघितलं असतं"; उपमुख्यमंत्री अजित पवारांची सूर्यकुमारवर मिश्किल टीप्पणी

"सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, धोनी, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर या सर्वांनी आपल्या भारतात हे क्रिकेट प्रत्येकाच्या मनात बिंबवण्याचं काम केलं"
Published on

Ajit Pawar On Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने ज्या प्रकारे झेल घेतला होता, त्याचा पाय बाहेर टेकला असता, तर आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता. त्यामुळे सूर्यकुमार यादवचं खूप खूप अभिनंदन. संपूर्ण भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागले होते. तू अप्रतिम झेल घेतला. रोहितनं सांगितलच, तु झेल नसता घेतला तर तुला बघितलच असतं. पण रोहितने एकट्यानं बघितलं नसतं, तर आम्ही सर्वांनी तुला बघितलं असतं. आमची लोकं फार वेडी आहेत. जिंकल्यावर खूप उदो उदो करतात. पण हरल्यानंतर दगड मारायला कमी पडत नाहीत, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवनातील सत्कार सोहळ्यात खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोहित शर्मा, सूर्युकमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल यांचा विशेष सन्मान केला.

अजित पवार पुढे म्हणाले, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, धोनी, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर या सर्वांनी आपल्या भारतात हे क्रिकेट प्रत्येकाच्या मनात बिंबवण्याचं काम केलं. १९८३ ला कपिल देव यांनी वर्ल्डकप जिंकवून आणला होता, तेव्हाही गर्दी जमली होती. आता सूर्यकुमारने जे काम केलंय, ते काम त्यावेळी कपिल देव यांनी केलं होतं. त्याचीही आठवण आपण विसरता कामा नये. रोहित तुम्ही आता इथून पुढं टी-२० खेळणार नाही, परंतु टी-२० क्रिकेट पाहत असताना रोहितची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मी रोहित शर्माचं आणि त्याचं संघाचं मनापासून कौतुक करतो. त्याचं पुढील स्वप्न साकार होण्यासाठी परमेश्वराने त्याला आशीर्वाद देवो.

मागच्या काळात धोनीसह अनेकांनी क्रिकेटमध्ये यश मिळवण्याचं काम केलं. परंतु, असा दिमाखदार कार्यक्रम आपल्या विधिमंडळात झाला नव्हता. तो कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकर आणि निलम गोऱ्हे या तिघांचंही मनापासून अभिनंदन करतो. फायनलच्या सामन्यात ३० चेंडू आणि ३० धावा असं समीकरण होतं. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना पाहिल्यावर अनेक क्रिकेटप्रेमींनी जिंकण्याची आशा सोडली होती. पण कुठतंरी असं वाटत होतं की, काहीतरी चमत्कार घडेल आणि तो चमत्कार घडला. पहिल्या सामन्यापासून प्रत्येक वेळी आपण यश मिळवत गेलो. प्रत्येक खेळाडूंना यामध्ये स्वत:चा उत्तमप्रकारे खेळ दाखवला.

रोहित बाद झाल्यानंतर विराटची बॅट तळपली. शिवम दुबे, अक्षर पटेलनेही चांगली फलंदाजी केली. त्यानंतर आपल्या सर्वांच्या आशा वाढल्या. त्यानंतर बुमराह आणि हार्दिक पंड्यानं भेदक गोलंदाजी केली. माझ्या गेल्या ३०- ३५ वर्षांच्या कार्यकाळात एव्हढी प्रचंड गर्दी मी कधी मरिन ड्राईव्हला पाहिली नव्हती. एव्हढा जनसागर तिथे लोटला होता. सर्व भारतीय ज्या पद्धतीने क्रिकेटवर प्रेम करतात, अशा प्रकारचं प्रेम जगात कुठेही पाहायला मिळत नाही. ही पण वस्तुस्थिती आहे. या टूर्नामेंटमध्ये पहिल्यांदाच अमेरिकेचा संघ खेळायला आला. ज्या पद्धतीनं त्यांनी खेळ केला, ते पाहता पुढे त्यांचा संघ चांगला खेळ करू शकेल. त्या संघात आपल्याही भागातील काही खेळाडू होते, असंही अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com