Ajit Pawar
Ajit Pawar

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या सुप्रिया सुळे आणि आमदार संग्राम थोपटे यांच्यावर टीका केली. ते त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत भोरमध्ये बोलत होते.
Published by :

गेल्या पाच वर्षात आमदार,खासदाराने काय केलं? मत मागण्यासाठी दोघे एकत्र येतात आणि मतं मिळालं की दोघेही दोन्ही बाजूला जातात, अशी कामाची पद्धत असेल तर भोर तालुक्याचा विकास कसा होणार? असा सवाल उपस्थित करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाव न घेता सुप्रिया सुळे आणि संग्राम थोपटे यांच्यावर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाता माझा मावळा पेटून उठायचा. अठरा पगड जाती, बाराबलुतेदारांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तशा पद्धतीने भोरचा मावळा पेटून उठला पाहिजे आणि आम्हाला मदत केली पाहिजे. एकदा आम्हाला महायुतीला संधी देऊन बघा. आम्ही काम नाही केलं, तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा. पण तशी वेळ तुमच्यावर येऊ देणार नाही, असं आश्वासनही पवारांनी यावेळी जनतेला दिलं. ते भोर तालुक्यात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

अजित पवार जनतेला संबोधीत करताना म्हणाले, मागील खासदाराने आपल्याकडे केंद्राचा निधी आणला नाही. आता तो खड्डा भरून काढायचा आहे. मी पुण्यात मोदींच्या सभेत होतो. तेव्हा मी म्हणालो, या भागात आंतरराष्ट्रीय विमानळ करायचं, रेल्वे लाईन सुरु करायची, राष्ट्रीय महामार्ग सुरु करायचे, या पद्धतीचं काम भोरकरांनो आपल्याला करायचं आहे. महाविकास आघाडी खोटं आश्वासन देत राहतील. इतके दिवस इकडच्या खासदाराने काय केलं, असं म्हणत पवारांनी सुळेंवर अप्रत्यक्षरित्या टीका केली.

अजित पवार पुढे म्हणाले, भोरकरांनो तुम्ही इतके दिवस इतरांचे ऐकलं, पण एकदा अजित पवारांचं ऐकून बघा. तुम्ही कुणाच्याही भुलथापांना बळी पडू नका. कुणाच्याही आश्वासनांवर विश्वास ठेऊ नका. मी माझी बारामती घडवली. पिंपरी-चिंचवड घडवलंय. तशापद्धतीने मला आता इंदापूर बारामतीत जाऊन पुरंदर, भोर, मुळशी, हवेलीकडे लक्ष द्यायचं आहे. आमदार सुनील शेळके ९४ हजार मतांनी निवडून आला.

त्यांना त्यांच्या मतदारसंघात २४०० कोटी रुपये निधी दिला. पर्यटक तिथे यावं म्हणून ३०० कोटींचं स्कायवॉक केलं. काल मी उदयनराजे भोसले यांच्या सभेसाठी गेलो होतो. वाई, महाबळेश्वर, खंडाला येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना मिळण्यासाठी व्यवस्था केली जाईल, असं मी आश्वासन दिलं. येथील जवळच्या परिसरात वॉटर स्पोर्ट्स सुरु करून पर्यटनाला चालना देता येईल. मी ते करुन दाखवेल.

आता मला आमदारांना, खासदारांना विचारायचं कारण नाही. उद्या तुम्ही या खासदाराला निवडून दिलं, तर खासदारालाच कारमध्ये घेऊन फिरेल. सुनेत्रा मला काही म्हणणार नाही की, कशाला तिकडे नेता, मी माझ्या पत्नीला (सुनेत्रा पवार) सांगेल आपल्याला तिथे काम करायचं आहे. लोकांनी आपल्याला निवडून दिलंय. मी स्पष्ट सांगतो, मी कामाचा माणूस आहे. नरेंद्र मोदी देशाला पुढे नेत आहेत. तसं मला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपल्या महाराष्ट्राला पुढं घेऊन जायचं आहे.

आपलं स्वत:चं घर बनवत असताना जसं लक्ष द्यावं लागतं, तशा पद्धतीनं समाजाची कामं करत असताना सार्वजनिक कामामध्ये लक्ष द्यावं लागतं. त्यावेळी बारामती घडते. अशी जादूची कांडी फिरत नाही. माझ्या इथले एसटी स्टँड बघा आणि इथले एसटी स्टँड बघा. इथल्या आमदारांनी झोपा काढल्या का, इतके वर्ष तुम्ही आमदाराला निवडून देता. तुम्हाला तुमच्या भागातील बंद झालेल्या बस चालू करता येत नाहीत आणि तुम्ही मला म्हणता, पालकमंत्री असताना काय केलं? तु काय दिवा लावलाय, ते सांगा आधी. तुमचं काहीही ऐकून घ्यायला मी मोकळा नाही, असं म्हणत अजित पवारांनी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्यावर टीका केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com