Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांनी शरद पवारांकडून घेतले राजकारणाचे धडे आणि झाले महाराष्ट्राचे दादा

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांनी शरद पवारांकडून घेतले राजकारणाचे धडे आणि झाले महाराष्ट्राचे दादा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीत आले असताना आज सकाळी सुमारे ८.४५ वाजता लँडिंगदरम्यान त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील सर्व सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.

अपघात इतका भीषण होता की विमानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घटनास्थळी तातडीने पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासनाने धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र सर्व प्रवासी मृत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून नागरी विमान वाहतूक विभागाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

२२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यात जन्मलेले अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे पुतणे होते. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. गेल्या चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेल्या अजित पवारांनी आठ वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवले. विविध सरकारांमध्ये त्यांनी महत्त्वाची मंत्रीपदे सांभाळली.

१९८० च्या दशकात राजकारणात प्रवेश केलेल्या अजित पवारांनी १९९५ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून विजय मिळवला. त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग निवडणुकांमध्ये ते विजयी होत आले. बारामतीचे ‘दादा’ अशी ओळख निर्माण करत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा दरारा निर्माण केला.

अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीहून तातडीने बारामतीकडे रवाना झाले. पंतप्रधानांसह देशभरातील अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. अजित पवार यांच्या अचानक जाण्याने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून त्यांच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावशाली नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com