Ajit Pawar : अजित पवारांची कार्यतत्परता अखेरपर्यंत कायम; अपघातस्थळी सापडला कागदपत्रांचा ढीग

Ajit Pawar : अजित पवारांची कार्यतत्परता अखेरपर्यंत कायम; अपघातस्थळी सापडला कागदपत्रांचा ढीग

शासकीय बैठकांपासून राजकीय कार्यक्रमांपर्यंत आणि लोकांच्या गराड्यात सतत वावरणारे उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी अचानक काळाच्या पडद्याआड गेले.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

शासकीय बैठकांपासून राजकीय कार्यक्रमांपर्यंत आणि लोकांच्या गराड्यात सतत वावरणारे उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी अचानक काळाच्या पडद्याआड गेले. मात्र निधनाच्या अखेरच्या क्षणापर्यंतही ते आपल्या कामात पूर्णपणे गुंतलेले होते, हे अपघातानंतर समोर आलेल्या घटनाक्रमातून स्पष्ट झाले आहे. अपघातस्थळी सापडलेला महत्त्वाच्या कागदपत्रांचा ढीग अजितदादांच्या कार्यतत्परतेची साक्ष देतो. अजित पवारांनी आयुष्यभर जपलेली शिस्त आणि वेळेची काटेकोरता त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाही. निधनाच्या आदल्या दिवशी मंगळवारी सकाळी नऊ वाजताच ते मंत्रालयात दाखल झाले होते. सकाळी ९ ते ९:३० या वेळेत त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभाग आणि मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. अर्थसंकल्प जवळ आल्याने त्यानंतर ९:३० वाजता नियोजित आर्थिक बैठक घेण्यात आली.

यानंतर ११:३० वाजता मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी पक्षाच्या मंत्र्यांसोबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. काही मंत्री गैरहजर असतानाही अजित पवार प्रशासकीय कामाला प्राधान्य देत बैठकीस उपस्थित राहिले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीतही ते सक्रिय सहभाग घेत होते. मंगळवारी मंत्रालयातील कामकाज आटोपल्यानंतर अजित पवार नेहमीप्रमाणे ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी परतले. दर मंगळवारी घेण्यात येणारी मंत्री आणि आमदारांची बैठक त्यांनी नियोजित वेळेत घेतली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी, प्रचाराचे नियोजन आणि संघटनात्मक बाबींचा आढावा घेण्यात आला.

यानंतर रात्री उशिरा ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी गेले. राज्यातील जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि अजित पवार गट कुठे एकत्र येऊ शकतो, याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. ही बैठक आटोपून अजित पवार पुन्हा देवगिरीवर परतले. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून ते बारामतीकडे रवाना होण्याच्या तयारीत होते. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी निरावागज, पणदरे, करंजेपूल आणि सुपा येथे त्यांच्या चार सभा नियोजित होत्या. राज्यात थंडीमुळे धुके असल्याने बारामतीतील हवामानाची माहिती घेण्यात आली. वातावरण अनुकूल असल्याचा निरोप मिळाल्यानंतर सकाळी ७:३० वाजता अजित पवार विमानतळाकडे रवाना झाले. निघताना त्यांनी महत्त्वाची कागदपत्रे, निवेदने आणि कामाशी संबंधित फाइल्स सोबत घेतल्या होत्या. दुर्दैवाने, त्याच प्रवासात झालेल्या विमान अपघातात त्यांचे निधन झाले. मात्र शेवटपर्यंत कामाशी नाळ जुळलेली ठेवणारे अजित पवार आजही त्यांच्या कार्यशैलीसाठी आठवले जात आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com