Ajit Pawar Convoy Vehicle Accident :  अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, 4 जण गंभीर जखमी

Ajit Pawar Convoy Vehicle Accident : अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, 4 जण गंभीर जखमी

बीड जिल्ह्यात शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात झाला.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

बीड जिल्ह्यात शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात झाला. तेलगाव–धारूर मार्गावरील धुनकवाड फाटा परिसरात घडलेल्या या दुर्घटनेत एका दुचाकीला धडक बसून चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

धुनकवाड येथे पवारांचा ताफा तेलगाववरून केजच्या दिशेने जात असताना, ताफ्यातील MH 02 GH 5732 क्रमांकाची गाडी अचानक पुढे आलेल्या दुचाकीवर आदळली. दुचाकीवरील विष्णू दामोदर सुदे, त्यांची पत्नी कुसुम सुदे आणि दोन लहान मुली या चौघांना गंभीर दुखापती झाल्या असून, अपघातानंतर वाहन पलटी झाल्याने ताफ्यातील एक सुरक्षा रक्षकही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

जखमींना प्रथम धारूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना पुढील उपचारांसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला, तर ताफ्यातील गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी हटवली असून, प्राथमिक तपासात हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे संकेत मिळत आहेत. संबंधित वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी सुदे कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा असा गंभीर अपघात झाल्याने शासकीय ताफ्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com