Ajit Pawar : अधुरीच राहिली अजितदादांची स्वप्नं; मुख्यमंत्रिपदापासून राष्ट्रवादी एकीकरणापर्यंत अपूर्ण प्रवास
राजकारणात पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न मोठं असतं. कार्यकर्ता ते नगरसेवक, नगरसेवक ते नगराध्यक्ष, आमदार, मंत्री आणि अखेरीस मुख्यमंत्री हा प्रवास अनेकांच्या मनात असतो. गेली चार दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे वावरणाऱ्या अजित पवारांच्याही मनात अशीच काही स्वप्नं होती. मात्र बारामतीकडे येताना त्यांच्या विमानाला झालेल्या दुर्दैवी अपघाताने तो प्रवास अचानक थांबला आणि त्यांच्या अनेक आकांक्षा अधुर्याच राहिल्या.
मतदारसंघातला असो वा बाहेरचा ज्याचा मुद्दा पटला, त्याचं काम करून देणारा नेता अशी अजितदादांची ओळख होती. विकास, प्रशासन आणि निर्णयक्षमता यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी असंख्य लोकांची स्वप्नं साकारली. पण विडंबन असं की, त्यांच्या स्वतःच्या काही महत्त्वाच्या स्वप्नांना पूर्णत्व मिळालं नाही.
मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न अधुरंच
“जे पोटात तेच ओठावर” हा अजित पवारांचा स्वभाव. त्यामुळे त्यांची स्वप्नं कधीच लपून राहिली नाहीत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनणं हे त्यांच्या आकांक्षांच्या यादीत सर्वात वर होतं. 2004 साली संधी जवळ आली होती; मात्र त्या वेळी मुख्यमंत्रिपदाचा मान काँग्रेसकडे गेला. त्यानंतरही दादांनी उपमुख्यमंत्रिपदावर ठसा उमटवला. राज्यात मुख्यमंत्री बदलत राहिले, पण उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार कायम चर्चेत राहिले. मुख्यमंत्रिपदाने मात्र त्यांना वारंवार हुलकावणी दिलीविरोधकांनी टोमणे मारले, तरी दादांनी त्याकडे दुर्लक्ष करत कामाचा वेग कायम ठेवला.
राष्ट्रवादी एकीकरणाचं स्वप्नही अपूर्ण
अलिकडच्या काळात दादांच्या दौर्यांदरम्यान “भावी मुख्यमंत्री” असे बॅनर दिसत होते. पण नियतीला ते मान्य नव्हतं. मुख्यमंत्रिपदासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचं सर्वार्थाने एकीकरण घडवण्याचं स्वप्नही अपूर्ण राहिलं. पक्ष दुभंगला असला, तरी पवार कुटुंबातील ओलावा कायम होता. पुणे–पिंपरीसारख्या ठिकाणी महापालिका निवडणुकांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या. या मनोमिलनासाठी सर्वाधिक आग्रही असलेले नेते म्हणजे अजित पवार—याचे संकेत त्यांनी वेळोवेळी दिले होते.
मात्र त्यांच्या हयातीत राष्ट्रवादी दुभंगली आणि सर्वार्थाने एकत्र येण्याआधीच अजितदादांनी या जगाचा निरोप घेतला. महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणारा हा नेता आज आठवणींत राहिला स्वप्नं मोठी असलेली, कामगिरी भक्कम असलेली, पण काही स्वप्नं अधुरीच ठेवून गेलेली.
