सागर कारंडेची 61 लाखांची फसवणूक; Cyber Crime प्रकरणी अक्षयकुमार अटकेत
प्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेता सागर कारंडेची फसवणूक करणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अक्षयकुमार गोपलन असं या आरोपीचं नाव आहे. त्याला ठाण्यातून अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितल आहे. सागर कारंडेला व्हॉट्स अॅपवर आलेल्या लिंकच्या माध्यमातून फसवल्याची माहिती समोर येत आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर प्रत्येक क्लिकमागे 150 रुपये देण्याचं आमीष सागरला दाखवण्यात आलं.
सुरूवातीला सागरने 11 हजार रुपये कमवले, आणि सायबर भामट्याच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर सागरला अधिक कमाईचं आमिष दाखवण्यात आलं. सुरुवातीला 27 लाखांची गुंतवणूक आणि कालांतराने 19 लाख आणि त्यावर 30 टक्के करासह एकूण 61 लाख 83 हजारांची गुंतवणूक सागरला करण्यास भाग पाडण्यात आलं आणि फसवणूक झाल्याचं लक्षात येताच सागर कारंडेनं पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार सायबर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत सायबर भामटा अक्षयकुमार गोपलनला अटक केली आहे. अक्षयनं अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आल असून तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाणे उत्तर विभागाचे पोलिस अधिक तपास करत आहेत.