अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव; प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणी
बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. बदलापूरच्या घटनेवरुन पालकांसह नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आता याच प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
तळोजा जेलमध्ये पोलीस आरोपीचा ताबा घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्याला बदलापूरला घेऊन जात असताना अक्षय शिंदे याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि तीन राऊंड फायर केले. यामधील एक गोळी API निलेश मोरे या पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला लागली तर इतर दोन राऊंड मिसफायर झाले.
त्यानंतर सेल्फ डिफेन्ससाठी पोलीस अधिकाऱ्यांनी गोळ्या झाडल्या. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केला. गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात ही घटना घडली.
याच पार्श्वभूमीवर आता अक्षय शिंदेच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतल्याची माहिती मिळत आहे. या घटनेच्या तपासासाठी एसआयटी नेमावी, अशी मागणी त्यांनी कोर्टाकडे केली आहे. आपल्या मुलाचा मृत्यू झालेली पोलीस चकमक बनावट चकमक असल्याचा दावा करत अक्षय शिंदेच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर हायकोर्टात आजच सुनावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे.