Alcohol sale : सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात झाली मद्यविक्री

Alcohol sale : सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात झाली मद्यविक्री

भारतात सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. आधी नवरात्री नंतर दसरा आणि आता दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या सणासुदीच्या काळात मद्यविक्री मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे समोर आले आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात झाली मद्यविक्री

  • प्रीमियम सेगमेंटच्या दारूला जोरदार मागणी

  • आगामी काळात विक्री आणखी वाढण्याची शक्यता

भारतात सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. आधी नवरात्री नंतर दसरा आणि आता दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या सणासुदीच्या काळात मद्यविक्री मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डिसेंबरच्या तिमाहीत दारूच्या विक्रीत 20 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही काळापासून प्रत्येक प्रकारच्या दारूच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सणासुदीच्या काळात अनेकांनी दारू पिण्यावर भर दिल्याचे समोर आले आहे. या काळात मद्य क्षेत्रात मोठी उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हिस्की, स्कॉच, रम, वोडका, जिन आणि टकीला यासारख्या दारूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केवळ मोठ्या शहरांमध्ये नव्हे तर लहान शहरांमध्येही दारूची विक्री वाढली असल्याचे समोर आले आहे. संपूर्ण देशात प्रीमियम आणि लक्झरी ब्रँडची विक्री वाढल्याने कंपन्यांना आर्थिक फायदा झाला आहे.

प्रीमियम सेगमेंटच्या दारूला जोरदार मागणी

दारूची विक्री वाढण्याबाबत बोलताना रेडिको खेतानचे सीईओ अमर सिन्हा म्हणाले की, ‘यंदा सणासुदीच्या महिन्यांत आमच्या प्रीमियम आणि लक्झरी सेगमेंटच्या दारूची मागणी वाढली आहे. यामुळे ग्राहकांची पसंती प्रीमियम सेगमेंटकडे वाढत असल्याचे दिसत आहे. भारतात सणासुदीच्या काळात नेहमीच विक्री वाढत असते, मात्र यावर्षी अपेक्षापेक्षा जास्त विक्री झाली आहे.

पुढे बोलताना अमर सिन्हा यांनी सांगितले की, ‘आमच्या रामपूर इंडियन सिंगल माल्ट आणि जैसलमेर इंडियन क्राफ्ट जिनला मार्केटमध्ये चांगली पसंती मिळाली आहे. या सणासुदीच्या काळात विक्रीत गती निर्माण झाल्यामुळे डिसेंबर तिमाहीतही विक्रीची गती चांगली राहिल अशी आम्हाला आशा आहे.’

मद्य विक्रीवर सकारात्मक परिणाम

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीजचे महासंचालक अनंत एस. अय्यर यांनी याबाबत म्हटले की, ‘या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान मद्यविक्रीत 10 ते 20 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. चांगला पाऊस आणि आर्थिक सुबत्तेमुळे दारूचा खप वाढला आहे. तसेच ग्रामीण भागातही खर्च करण्याची क्षमता वाढली आहे, यामुळे विक्रीवर सकारात्मक परिणाम झाला आहे.

आगामी काळात विक्री आणखी वाढण्याची शक्यता

मद्य विक्रीतील तज्ञांच्या मते, येत्या काही महिन्यांत प्रीमियम आणि फ्लेवर सेगमेंटमधील विक्री आणखी वाढण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात अनेक लोक एकत्र येतात त्यामुळे मद्य आणि भेटवस्तू खरेदीत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाचा सणासुदीचा काळ फायदेशीर ठरला आहे. आता जानेवारीच्या सुरूवातीपर्यंत वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com