EVM Machine
EVM MachineEVM Machine

EVM Machine : ईव्हीएम छेडछाडीचा आरोप; मतमोजणी पुढे ढकलल्याने ‘ईव्हीएम हटाव सेने’चा संताप

महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांच्या मतमोजणीला अचानक २१ डिसेंबरची तारीख दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांच्या मतमोजणीला अचानक २१ डिसेंबरची तारीख दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. मतमोजणी उशिरा करण्याच्या निर्णयावर ईव्हीएम हटाव सेना यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ईव्हीएम सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

२ डिसेंबरला झालेल्या काही नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला लागणार होता. मात्र नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार आता सर्व नगरपरिषदेची मतमोजणी २१ डिसेंबरला घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यापूर्वी काही ठिकाणच्या निवडणुका स्थगित करून २० डिसेंबरला मतदान घेण्याचेही आदेश दिले होते.

या बदललेल्या वेळापत्रकामुळे मतदान झालेल्या ईव्हीएम मशिन्सना तब्बल १८ ते २० दिवस गोदामात ठेवावे लागणार आहेत. यावर ईव्हीएम हटाव सेनेचे पदाधिकारी अमित उपाध्याय यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मतदानानंतर मशीन इतक्या दिवस सील न करता किंवा जनतेच्या थेट देखरेखीशिवाय साठवणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

उपाध्याय म्हणाले, “ईव्हीएम मशिन्स दीर्घकाळ गोदामात ठेवण्यात येत असल्याने छेडछाडीची शक्यता नाकारता येत नाही. मतमोजणी पुढे ढकलण्याचा निर्णय पारदर्शकतेला मारक आहे. आयोगाने याचे स्पष्ट स्पष्टीकरण द्यावे.”

मतमोजणी पुढे ढकलण्यामागील कारणांवर विविध राजकीय पक्षांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, या घडामोडींमुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा राजकीय तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com