Almatti Dam: आंतरराज्य समन्वय बैठक, अलमट्टी धरण व्यवस्थापनाबाबत महत्त्वाचे निर्णय
पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी आंतरराज्य बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये अलमट्टी धरणाची जलपातळी १५ ऑगस्टपर्यंत ५१७ मीटरपर्यंत प्रस्ताव ठेवण्यात आला. ही बैठक ऑनलाइन स्वरुपात होती. यामध्ये कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पार पडली. या बैठकीत पूर नियंत्रणासाठी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. पंचगंगा आणि कृष्णा नद्यांतील जलपातळी तसेच अलमट्टी धरणातील विसर्ग व्यवस्थापन हे चर्चेचे मुख्य विषय होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनांमध्ये समन्वय वाढवण्याचे ठरले.
बैठकीत निर्णय घेण्यात आला की, अलमट्टी धरणातून किती आणि कधी पाणी सोडण्यात येणार आहे, याची माहिती महाराष्ट्राच्या संबंधित यंत्रणांना वेळेवर पुरवण्यात यावी. संभाव्य पूरस्थिती ओढवल्यास चारही जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा एकत्रितपणे कार्य करतील. स्थानिक प्रशासन, महसूल, पोलीस, आरोग्य आणि जलसंपदा विभाग यांच्यात समन्वय अधिक बळकट केला जाणार आहे. पूरसदृश परिस्थितीत नागरिकांना वेळेत माहिती देण्यासाठी इशारा प्रणाली अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. पूरप्रवण भागातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, बंधाऱ्यावरील बरग्यांचे वेळीच काढून टाकणे, नदीपात्रातील अनधिकृत अडथळे दूर करणे यासारख्या उपाययोजनांवर चर्चा झाली.
या संदर्भात २९ मे रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांचे मुख्य सचिव यांची संयुक्त बैठक होणार असून, यामध्ये आणखी निर्णय घेण्यात येतील. या बैठकीस संबंधित जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी व धरण अभियंते उपस्थित होते.