Amazon : AI खातयं नोकऱ्या! अॅमेझॉनमधील ५ लाख नोकर्या जाणार; नेमकं प्रकरण काय?
थोडक्यात
- अॅमेझॉनने आपल्या कामकाजात रोबोटिक ऑटोमेशनचा वेगाने विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. 
- या तंत्रज्ञानामुळे कंपनीला येत्या काही वर्षांत लाखो कर्मचारी भरती करण्याची गरज भासणार नाही. 
- ऑटोमेशन प्रणालीमुळे अमेरिकेत २०२७ पर्यंत सुमारे १.६ लाख नवीन कर्मचारी भरती करण्याची आवश्यकता टाळू शकेल 
Amazon to Replace Human Jobs with Robots : ई-कॉमर्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना, अॅमेझॉनने आपल्या कामकाजात रोबोटिक ऑटोमेशनचा वेगाने विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, या तंत्रज्ञानामुळे कंपनीला येत्या काही वर्षांत लाखो कर्मचारी भरती करण्याची गरज भासणार नाही आणि मोठ्या प्रमाणात खर्च बचत होणार आहे.
ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉन आपल्या ऑटोमेशन प्रणालीमुळे अमेरिकेत २०२७ पर्यंत सुमारे १.६ लाख नवीन कर्मचारी भरती करण्याची आवश्यकता टाळू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या प्रक्रियेमुळे कंपनीला प्रत्येक पिकिंग, पॅकिंग आणि डिलिव्हरी केलेल्या वस्तूमागे अंदाजे ३० सेंट्स म्हणजेच सुमारे २६ रुपयांची बचत होणार असल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, पुढील काही वर्षांत अॅमेझॉनची विक्री दुप्पट होण्याची शक्यता आहे. तरीही, रोबोटिक ऑटोमेशनच्या माध्यमातून २०३३ पर्यंत कंपनीला आणखी ६ लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्याची गरज भासणार नाही. सध्या अॅमेझॉनकडे सुमारे १२ लाख कर्मचारी कार्यरत आहेत.
कंपनीच्या या धोरणांमुळे बाहेरील प्रतिमेवर परिणाम होऊ नये म्हणून अॅमेझॉनने काही शब्द वापरणे टाळले असल्याचे समोर आले आहे. “ऑटोमेशन” आणि “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” या शब्दांऐवजी “प्रगत तंत्रज्ञान” हा शब्द वापरण्यात आला आहे, तर “रोबोट्स”ऐवजी “कोबॉट्स” (मानव आणि रोबोट यांचा सहयोग) हा शब्द वापरला जात आहे. याचबरोबर कंपनीने “गुड कॉर्पोरेट सिटीझन” म्हणून सामाजिक सहभाग वाढवून सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यावर भर दिल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने नमूद केले आहे. अॅमेझॉनच्या प्रवक्त्या केली नँटेल यांनी सांगितले की, ही कागदपत्रे कंपनीतील एका विशिष्ट टीमचा दृष्टिकोन दर्शवतात. त्यांनी हेही स्पष्ट केले की, सणांच्या हंगामात कंपनीकडून २.५ लाख लोकांना नोकरी देण्याची योजना आहे. मात्र, या नोकरभरतीत कायमस्वरूपी किंवा कराराधारित नियुक्ती असेल का, हे अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
लक्षात घेण्यासारखे म्हणजे, २०१२ साली अॅमेझॉनने “किवा रोबोटिक्स” ही कंपनी तब्बल ७७५ दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतली होती. हीच खरेदी कंपनीच्या ऑटोमेशन प्रवासातील निर्णायक पायरी ठरली. गेल्या वर्षी अॅमेझॉनने आपले सर्वात प्रगत वेअरहाऊस सुरू केले, जिथे १००० हून अधिक रोबोट्स जवळपास मानवी हस्तक्षेपाशिवाय पॅकेजेसवर प्रक्रिया करतात. हा संपूर्ण बदल अॅमेझॉनच्या भविष्यातील कामकाजाची दिशा दर्शवतो. कमी मनुष्यबळ, अधिक तंत्रज्ञान आणि वाढती कार्यक्षमता.


