आदित्य ठाकरेंच्या सभेतील दगडफेकीवरुन अंबादास दानवेंचा सरकारवर आरोप, म्हणाले...
औरंगाबादेतील वैजापूर तालुक्यामधील महालगाव येथे शिवसेना(ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेतील सभा आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू असताना या ठिकाणी दगडफेक झाल्याची घटना घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार घडला नाही. या घटनेवरुन सध्या चर्चा सुरु झाली आहे.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, सरकारचे देखील आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. “आदित्य ठाकरे यांच्या सभेत अडथळे निर्माण करत दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न महालगाव (ता. वैजापूर) येथील सभेदरम्यान झाला. सदर गोंधळ घालणारे मिंधे गटाचे आमदार रमेश बोरणारे यांच्या नावाच्या घोषणा देत होते. आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि पोलीस अधिक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे.”असे दानवे म्हणाले.
यासोबतच ते म्हणाले की, मुद्दाम दलित समाज आणि हिंदू यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न या जमावामधील काहीजण करत होते. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येत असताना, अशापद्धतीने काही लोक मुद्दाम या जमावात घुसून वेगळं काम करण्याचा प्रयत्न केला याचा आम्ही निषेध करतो.” असेही ते म्हणाले.