Ambadas Danve : 'प्रशांत कोरटकर याची जीभ छाटली पाहिजे, हीच योग्य शिक्षा'
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “प्रशांत कोरटकर याची जीभ छाटली पाहिजे, हीच त्याच्यासाठी योग्य शिक्षा ठरेल,” असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.
प्रशांत कोरटकर याने काही दिवसांपूर्वी एका फोन कॉलद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह आणि अत्यंत संतापजनक वक्तव्य केल्याचे समोर आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर आणि विविध सामाजिक संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. कोरटकरविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे.
दरम्यान, प्रशांत कोरटकरला सशर्त जामीन मिळालेला असला तरी सध्या शासकीय सुट्टीमुळे त्याचा मुक्काम कळंबा कारागृहातच असल्याची माहिती आहे. उद्या दुपारनंतर त्याच्या जामिनावर सुटका होण्याची शक्यता असून, त्याला झालेली शिक्षा अत्यंत सौम्य असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
दानवे म्हणाले की, “महापुरुषांविषयी अपमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना केवळ कायदेशीर शिक्षा पुरेशी ठरत नाही. अशा व्यक्तींवर कठोर आणि उदाहरण म्हणून उभा राहील, अशी शिक्षा झाली पाहिजे. कोरटकरची जीभ छाटली पाहिजे, हीच प्रशांत कोरटकरसाठी योग्य शिक्षा असेल,” असे वक्तव्य त्यांनी केले.
सध्या महापुरुषांविषयी वारंवार वादग्रस्त विधाने करण्यात येत असल्याने समाजात असंतोष वाढत आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी जाणूनबुजून करण्यात येणाऱ्या वक्तव्यांमुळे समाजातील मुख्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित होत असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर, सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि महापुरुषांच्या सन्मानासाठी कठोर कायद्यांची आवश्यकता असल्याची मागणी पुन्हा एकदा पुढे येत आहे.