Amruta Fadnvis : अमृता फडणवीस यांना पुणे सत्र न्यायालयाची नोटीस; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी चर्चेचं कारण ठरत आहे सोशल मीडियावरील बदनामीप्रकरणी त्यांच्यावर चालू असलेला खटला.
एप्रिल 2025 मध्ये अमृता फडणवीस यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह, खोटा व बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत त्यांनी पुणे सायबर क्राईम पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सातही आरोपींना नोटीस पाठवून अटक केली होती. सध्या या सातपैकी पाच आरोपी पोलिस कोठडीत आहेत, तर दोन आरोपी फरार आहेत.
या पार्श्वभूमीवर आता पुणे सत्र न्यायालयाने अमृता फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. या खटल्यामध्ये त्यांचे वैयक्तिक म्हणणे काय आहे, याविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावे किंवा वकिलामार्फत आपले म्हणणे लेखी स्वरूपात सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी सोशल मीडियावर त्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. फडणवीस कुटुंबीयांविरोधात सोशल मीडियावर वारंवार चालणाऱ्या मोहिमा, त्यामागील संभाव्य राजकीय प्रेरणा, तसेच या प्रकरणाच्या तपासातील गुंतागुंत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अमृता फडणवीस यांनी या प्रकरणात अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांनी यापूर्वी अनेकदा सोशल मीडियावरून स्वतःविरोधात होणाऱ्या ट्रोलिंगला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी काय वळण घेते, याकडे राज्यातील राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचं लक्ष लागून आहे.