Air India Flight : उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच...; दिल्ली–इंदौर एअर इंडिया फ्लाइटची आपत्कालीन लँडिंग
दिल्लीहून इंदौरकडे रवाना झालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI 2913 ला रविवारी (31 ऑगस्ट) तातडीने दिल्ली विमानतळावर परत बोलावून आणावे लागले. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच कॉकपिट क्रूला उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचा इशारा मिळाल्यामुळे तातडीची खबरदारी घेत विमानाला परतवण्यात आले. पायलटने प्रसंगावधान राखत विमान सुरक्षितपणे उतरवले.
या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना पर्यायी विमानाने इंदौरकडे रवाना करण्यात आले आहे. विमानाला सध्या तपासणीसाठी ग्राउंडेड करण्यात आले असून नागरी उड्डाण महासंचालनालयाला (DGCA) या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
एअर इंडियाने एका निवेदनात सांगितले की, उड्डाणाच्या वेळी तांत्रिक बिघाडाचा इशारा मिळाल्याने सुरक्षा नियमांचे पालन करून इंजिन बंद करण्यात आले आणि विमान सुरक्षितपणे परत उतरवण्यात आले. कंपनीने प्रवाशांना पर्यायी सोय उपलब्ध करून दिली आहे.
गेल्या काही दिवसांत एअर इंडियाच्या फ्लाइट्समध्ये तांत्रिक समस्यांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. 18 ऑगस्ट रोजी कोची विमानतळावरून दिल्लीला जाणारी फ्लाइट अचानक टेकऑफच्या आधी थांबवावी लागली होती. तसेच 16 ऑगस्ट रोजी मिलान–दिल्ली फ्लाइट तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आली होती. वारंवार होणाऱ्या या बिघाडांमुळे प्रवाशांमध्ये चिंता वाढत आहे.