आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली; ४ फेब्रुवारी २०२३ ला होणार आंगणेवाडीची जत्रा

आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली; ४ फेब्रुवारी २०२३ ला होणार आंगणेवाडीची जत्रा

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आंगणेवाडी हे गाव आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आंगणेवाडी हे गाव आहे. लाखो भाविकांच श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीची जत्रा ४ फेब्रुवारी २०२३ ला होणार आहे. कोकणात जत्रा म्हटलं की उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. कोकणातील गावागावात वर्षाच्या ठराविक तिथीला प्रत्येक गावात जत्रा भरते. मात्र भराडी देवीच्या जत्रेची तारीख कुठल्या पंचागात अथवा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही, कारण ती निश्चित नसते. देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते.

सामान्य कोकणवासीयांसोबतच महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते,कलाकार मंडळी या देवीच्या यात्रेला दरवर्षी हमखास भेट देतात. दीड दिवसाच्या जत्रेमध्ये दरवर्षी कोट्यांची उलाढाल होत असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावाच्या आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी मातेचा ‘यात्रोत्सव आंगणेवाडी’ची यात्रा नावाने प्रसिद्ध आहे.

आंगणेवाडीच्या जत्रेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. खासकरुन मुंबईतून मोठया संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला जातात. देवीला कौलप्रसाद लावून यात्रोत्सव ठरविला जातो. मुंबईकरांची प्रचंड गर्दी असते. महापालिका नगरसेवक, महापौर, सर्व पक्षांची नेतेमंडळी, सिनेस्टार दर्शन घेतात.मालवण तालुक्यातील आंगणे वाडी हे लहानसे गाव आहे. या गावात 'भराडीदेवी' विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव 'भराडी देवी ' असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे माळरान.

आंगणेवाडी या गावातील केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. मात्र नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने ग्रामस्थांसोबत सामान्य नागरिकांना तिचे दर्शन खुले असते. आंगणेवाडीच्या भराडीदेवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो. साऱ्यांसाठी केवळ या आंगणेवाडीच्या महिला प्रसाद बनवतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com