Chandrapur Election : ज्येष्ठ नगरसेवकांना उमेदवारी नाकारल्याने संताप, वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर यांच्यात वाद
महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर चंद्रपूर काँग्रेसमध्ये मोठा अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून, माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील मतभेद उघडपणे समोर आले आहेत. उमेदवारी वाटपात वडेट्टीवार समर्थकांना डावलल्याचा आरोप होत असून, त्यामुळे काँग्रेसमधील असंतोष चव्हाट्यावर आला आहे.
तिकीट नाकारण्यात आल्याने अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काही अनुभवी नेत्यांनी थेट उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिला, तर वडेट्टीवार समर्थक असलेल्या काही इच्छुकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांसमोरच आता ‘घरचा विरोध’ उभा ठाकल्याचं चित्र आहे.
तिकीट वाटपावर खासदार धानोरकरांचे वर्चस्व?
काँग्रेसच्या तिकीट वाटपाची संपूर्ण जबाबदारी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतःकडे घेतल्याचं चित्र दिसत आहे. सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवारी ठरवली असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात अनेक ज्येष्ठ आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. “हे एकतर्फी निर्णय असून समन्वयाचा अभाव आहे,” असा आरोप काही माजी नगरसेवकांनी केला आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना सपकाळ यांनी या प्रक्रियेत योग्य समन्वय साधला नाही, असा दावा देखील असंतुष्ट गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटना कमकुवत होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
‘वय नव्हे, पद महत्त्वाचं’ कार्यकर्त्यांचा सूर
काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त करताना अनेक कार्यकर्त्यांनी नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “खासदार वयाने लहान असतील, पण पद मोठं असतं. त्या पदावर बसल्यानंतर सर्वांना सोबत घेऊन चालणं अपेक्षित असतं,” अशी भावना काही ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली. जुने, अनुभवी चेहरे बाजूला सारून केवळ नवीन उमेदवारांवर भर देणं हे पक्षासाठी घातक ठरत असल्याचं मत व्यक्त होत आहे.
महापौर पदाची संधी हातातून निसटण्याची भीती
सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसकडे चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता मिळवण्याची आणि महापौर बसवण्याची वास्तविक संधी होती. मात्र अंतर्गत मतभेद, अपक्ष उमेदवारांची बंडखोरी आणि नेतृत्वातील समन्वयाचा अभाव यामुळे ही संधी हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, विजय वडेट्टीवार यांच्यासारखा प्रभावी नेता या प्रक्रियेतून बाजूला पडल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली याआधी सात नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये काँग्रेसला यश मिळालं होतं, अशी आठवण कार्यकर्ते करून देत आहेत. त्यामुळे “अशा नेत्याला घरबसल्या ठेवणं म्हणजे पक्षाचंच नुकसान,” असा सूर आता काँग्रेसच्या अंतर्गत गोटातून उमटू लागला आहे.
काँग्रेससाठी धोक्याची घंटा
चंद्रपूरमधील ही परिस्थिती काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. एकीकडे भाजप आणि इतर पक्ष आक्रमक तयारीत असताना, काँग्रेसमध्येच असलेली ही फूट निवडणूक निकालांवर थेट परिणाम करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

