Anna Hazare : तपोवन वृक्षतोडीवर अण्णा हजारे संतप्त; “साधू-संत झाडावर राहतात का?”
नाशिक येथील तपोवन परिसरातील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे नाशिकमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. नागरिक, पर्यावरणप्रेमी, कलाकार आणि विरोधक यांनी एकत्र येऊन आंदोलनाचा आवाज बुलंद केला असतानाही प्रशासन मात्र आपल्या निर्णयावर ठाम दिसत आहे. तब्बल 1,270 झाडांची तोड झाल्यानंतर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या कारवाईवर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली उभारण्यात येत असलेल्या चार नव्या मलनिस्सारण केंद्रांसाठी ही झाडे अडथळा ठरत असल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, या स्पष्टीकरणावर अण्णा हजारे यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. “कुंभमेळ्यासाठी येणारे साधू-संत हे जंगलात राहणारे असतात, पण ते झाडावर राहतात काय? मग झाडे तोडण्याची गरज काय?” असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला.
राळेगणमध्ये एक फांदीही तोडली तर वेदना होतात, असे सांगत अण्णा म्हणाले, “देशहिताचे विचार करणारी माणसे कमी होत चालली आहेत. स्वार्थ वाढत आहे. परंतु अजूनही काही लोक समाजासाठी बलिदान देण्याची तयारी ठेवतात. आम्ही त्यातलेच आहोत.” अण्णा हजारे यांचा इशारा अधिक गंभीर होता. “आज जनता शांत आहे, पण एक दिवस येईल आणि ते सरकारला ‘चले जाव’ म्हणतील. कारण जनता मालक आहे आणि सरकार सेवक. मालकाचे हक्क हिरावून घेणे योग्य नाही,” असे ते म्हणाले.
दरम्यान, तपोवन परिसरातील मंदिरांनाही रस्ते व विकासकामाच्या कारणास्तव नाशिक महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. लक्ष्मीनारायण, साक्षी गोपाळ, शुर्पणखा यांसह अनेक मंदिरांना हे नोटिसांचे फटके बसले. यामुळे साधू-महंतांमध्येही रोष निर्माण झाला आहे. “मंदिरं नसतील तर कुंभमेळ्यातील साधू कुठे राहणार? एका बाजूला राम मंदिर उभं राहिलं, आणि इथे मात्र मंदिरांनाच नोटिसा? हे कोणतं राजकारण आहे?” असा प्रश्न महंत राम स्नेहीदास महाराजांनी उपस्थित केला.
याशिवाय, फाशीच्या डोंगरावर केलेल्या पर्यायी वृक्षलागवडीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मनपाने 7,300 झाडांची लागवड केल्याचा दावा केला असला, तरी पर्यावरणप्रेमींनी प्रत्यक्ष पाहणी करून 70–80 टक्के रोपटी वाळलेली असल्याचे सांगितले. “खडकाळ ठिकाणी वैज्ञानिक पद्धतीने न झालेली लागवड म्हणजे फसवणूकच,” अशी टीका त्यांनी केली. तपोवन वृक्षतोड, मंदिरांना नोटिसा आणि पर्यायी वृक्षलागवडीतील घोटाळ्यांच्या आरोपांमुळे नाशिकमध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनावर जनआक्रोश वाढत चालला आहे.
