Ramdas Kadam On Thackeray Bandhu: राजकीय भूकंपाची शक्यता?; राज-उद्धव एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांचे खळबळजनक आरोप
Ramdas Kadam On Thackeray Bandhu : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय एकतेची चर्चा रंगताना आता या चर्चेला वेगळं वळण मिळालं आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. रामदास कदम यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत दावा केला की, कणकवलीला जात असताना पोलिसांनी त्यांना मार्ग बदलण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आलं की राज ठाकरे यांच्यावर घातपाताची शक्यता आहे. कदम यांच्या म्हणण्यानुसार, हा कट उद्धव ठाकरे यांनी रचल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या प्रकरणाची पुष्टी राज ठाकरे यांच्याकडून करावी, असंही त्यांनी सुचवलं.
राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेबाबत बोलताना, कदम म्हणाले की त्यांनी केवळ पुणे आणि नाशिक या दोन जिल्ह्यांची मागणी केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यावर सहमती दिली नव्हती. "तेव्हा उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचा विचार का आला नाही?" असा थेट सवाल त्यांनी केला. याशिवाय, उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाचे टीकास्त्र सोडताना, त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरेंचा जीव फक्त मुंबई महापालिकेत अडकला आहे. त्यांना महाराष्ट्राच्या हिताशी काही देणं-घेणं नाही. कदम यांनी उद्धव ठाकरे काँग्रेससोबतचा संबंध कायम ठेवणार की नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित केला.
कदम यांनी जुने आठवताना सांगितले की, 2004-05 मध्ये राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर आणि रामदास कदम यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलं होतं, सहकार्याच्या अपेक्षेने. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं की "एक म्यानात दोन तलवारी राहत नाहीत." शेवटी, कदम यांनी दावा केला की जर पुन्हा मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांची सत्ता आली, तर उरलेसुरले मराठी नागरिकही शहराबाहेर फेकले जातील.