Nepal Violence : Gen Z च्या आंदोलनाच्या वादळाचा तडाखा नेपाळ सरकारला; क्षणार्धात 11 मंत्र्यांनी सोडले पद
काठमांडू नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाने सोमवारी नवे वळण घेतले. राजधानीसह विविध भागात झालेल्या हिंसक संघर्षानंतर सरकारमधील तब्बल 11 मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राजीनामा देणाऱ्यांमध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य आणि माहिती व प्रसारण मंत्री यांचा समावेश आहे. हे सर्व मंत्री सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करून म्हणाले की, नागरिकांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही आणि लोकशाहीवर अंकुश आणण्याचा प्रयत्न स्वीकारार्ह नाही.
दरम्यान, कायदेमंत्री अजय कुमार चौरसिया यांच्या घराला आंदोलकांनी आग लावल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. सुरक्षादलांना आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा लागला. या संघर्षात आतापर्यंत 25 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावून शांततेचे आवाहन केले आहे. मात्र, सोशल मीडिया बंदी आणि नवीन नियमावलीविरोधात युवकांचा तीव्र रोष सुरूच आहे.
नेपाळ सरकारने नुकतेच संसदेत विधेयक सादर केले असून त्यानुसार सोशल मीडिया कंपन्यांना नोंदणीसह स्थानिक प्रतिनिधी नियुक्त करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, या निर्णयाला सेन्सॉरशिप मानत तरुणाई रस्त्यावर उतरली आहे.