Ajit Pawar : पुण्यातील समस्या सोडवण्यासाठी अजित पवारांचा जनसंवाद; हडपसरमध्ये तीन हजार तक्रारींची नोंद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हडपसर येथे भरलेल्या ‘जनता दरबार’मध्ये नागरिकांना दिलेल्या आश्वासनांमुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी पाणी, ड्रेनेज, रस्ते, वीजपुरवठा अशा मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले. या दरम्यान नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी नोंदवण्यात आल्या.
‘जनसंवाद’ या उपक्रमाची सुरुवात हडपसर विधानसभा मतदारसंघातून झाली असून, या कार्यक्रमाद्वारे अजित पवार थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत. राज्यभरात पुढील वर्षभर हा उपक्रम राबवला जाणार असून दर आठवड्याला एका मतदारसंघात याचे आयोजन होईल. हडपसरमध्ये झालेल्या पहिल्या जनसंवादात जवळपास तीन हजार तक्रारी नोंदल्या गेल्या.
या दरम्यान पाणीटंचाई, आरोग्य सेवा, वाहतूक, वीजपुरवठा आणि सोसायट्यांमधील विविध अडचणी अशा अनेक मुद्द्यांवर नागरिकांनी थेट उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडणी केली. त्यावर पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनेक तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
कार्यक्रमाला स्थानिक आमदार चेतन तुपे पाटील, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांसह वरिष्ठ अधिकारी आणि माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवार यांनी नागरिकांच्या अडचणी सोडवणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे सांगत, "पालकमंत्री म्हणून पुण्याच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," अशी ग्वाही दिली.