Crime News : पगाराच्या मागणीने घेतला तरुणाचा जीव: डोळा फोडला, नेमकं प्रकरण काय?
एकत्रित पगार मागणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा बियरबारमध्ये स्वयंपाक्या म्हणून काम करणाऱ्या तरुणाची अमानुष हत्या केली. ही घटना रविवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी बारमालक व मॅनेजरविरुद्ध सिल्लोड ग्नामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुणाचे नाव अतुल प्रल्हाद पाडळे (वय २१, रा. वाकडी, ता. भोकरदन, जि. जालना) असे आहे. तो घाटनांद्र्यातील एका बीयर बारमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होता. ३० एप्रिल रोजी रात्री १२ वाजता त्याने मालक मनीष जयस्वाल याच्याकडे पगाराची एकत्रित रक्कम मागितली होती. यामुळे संतप्त झालेल्या जयस्वाल व मॅनेजर दिनेश परदेशी (दोघे रा. घाटनांद्रा) यांनी अतुलवर अत्याचार करत त्याला बेदम मारहाण केली, डोळा फोडला व गुप्तांगावर हल्ला केला. या अमानुष मारहाणीत अतुलचा मृत्यू झाला.
या घटनेचा संशय येऊ नये म्हणून मृतदेह बारमध्ये आढळल्याचे नाट्य उभे करत आले. जयस्वालनेच १ मे रोजी सकाळी पोलिस व नातेवाइकांना माहिती दिली. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात व पोस्टमॉर्टम अहवालात हत्येचे स्पष्ट संकेत मिळाल्यानंतर गुन्हा उघडकीस आला. अतुलच्या पश्चात त्याचे आई-वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील हा तरुण आपला पगार घेण्यासाठी गेलेला असताना झालेल्या या अमानुष प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.