Pune Crime : भोंदू ज्योतिषानं महिलेला एकांतात बोलावलं, अन् पुढे...; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड
पुणे शहरातील धनकवडी परिसरात एका स्वयंघोषित ज्योतिषाच्या आडून महिलांशी गैरवर्तन केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. एका 25 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित व्यक्तीस पुणे पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.
तक्रारकर्त्या महिलेला तिच्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत "श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय" या नावाने प्रसिद्ध असलेल्या या ज्योतिषाचा सल्ला घेण्याचं सुचवलं होतं. 12 जुलै रोजी ती भावाच्या पत्रिकेसह त्याच्या कार्यालयात पोहोचली. भविष्य सांगताना संबंधित ज्योतिषाने एका विशेष वनस्पतीच्या वापराची गरज असल्याचं सांगून तिला पुन्हा बोलावलं.
त्यानंतर 19 जुलै रोजी जेव्हा तरुणी कार्यालयात पुन्हा गेली, तेव्हा त्या ज्योतिषाने तिला एकट्यात घेऊन 'मंत्रवाचनासाठी डोक्यावर वस्तू ठेवावी लागेल' असं सांगत, तिच्याशी शारीरिक संपर्क करण्याचा प्रयत्न केला. महिलेला प्रकाराचा संशय येताच तिने तत्काळ बाहेर जाऊन भावाला फोन केला व पोलिसात तक्रार दाखल केली.
सहकारनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीच्या कार्यालयावर छापा टाकून त्याला अटक केली. अटकेतील व्यक्तीचे नाव अखिलेश लक्ष्मण राजगुरु (वय 45, रा. राजधानी अपार्टमेंट, धनकवडी) असे आहे.
सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गौड यांनी सांगितले की, या व्यक्तीविरोधात इतर महिलांनी देखील तक्रारी करण्याची शक्यता असून, त्याच्या कारवायांची चौकशी सुरु आहे. न्यायालयात त्याला रविवारी हजर करण्यात येणार आहे. तपास सुरु असून पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या भोंदू व्यक्तींपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.