Walmik Karad : संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींवर कारागृहात हल्ला, बबन गितेच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
बीडमधील मस्साजोग येथील संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना कारागृहामध्ये मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. कारागृहात सकाळच्या सुमारास महादेव गिते आणि अक्षय आठवले हे दोघंही वाल्मीक कराडवर धावून गेले. त्याचवेळी त्यांच्यामध्ये वाद आणि मारामारी झाली.
काही दिवसांपूर्वी महादेव गितेच्या वाढदिवसाच्या दिवशीही बबन गिते याच्याकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. यामध्ये बबन गितेने म्हटले होते की, हॅपी बर्थडे महादेव गिते, "तुम तिलक हो हमारे माथे का", असे म्हटले होते. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बापू आंधळे खून प्रकरणात बबन गिते गेल्या 9 महिन्यांपासून फरार आहे. तो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतो मात्र पोलिसांच्या हाती लागत नाही.
कोण आहे बबन गिते ?
लोकसभा निवडणुकीपूर्वी बबन गिते याने शरद पवार गटात प्रवेश केला होता. एकेकाळी बबन गिते हा धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक मानला जायचा. मात्र, त्याने प्रचंड शक्तीप्रदर्शन करत शरद पवार गटात प्रवेश केला होता. यानंतर बीडमधील राजकीय समीकरणे बदलली होती. परंतु, नंतरच्या काळात बापू आंधळे खून प्रकरणामुळे बबन गिते हा फरार झाला होता. तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.