CJI BR Gavai : सरन्यायाधीश गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टात हल्ल्याचा प्रयत्न; ...  पंतप्रधान म्हणाले...

CJI BR Gavai : सरन्यायाधीश गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टात हल्ल्याचा प्रयत्न; ... पंतप्रधान म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी.आर. गवई (CJI BR Gavai) यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना ही घटना घडली.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न

  • आरोपी वकिलाचे नाव राकेश किशोर

  • पंतप्रधानांचा सरन्यायाधीश गवईंना फोन

सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना ही घटना घडली. एका वकिलाने घोषणाबाजी करून देशाचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याने सर्वोच्च न्यायालय हादरले.

आरोपी वकिलाचे नाव राकेश किशोर आहे. तो 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बारमध्ये नोंदणीकृत होता. मध्य प्रदेशातील खजुराहो येथे भगवान विष्णूच्या 7 फूट उंच शिरच्छेदित पुतळ्याच्या जीर्णोद्धारावर सरन्यायाधीश गवई यांच्या टिप्पण्यांमुळे वकील नाराज असल्याचे मानले जाते. 16 सप्टेंबर रोजी, सरन्यायाधीशांनी तुटलेल्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराची मागणी करणारी याचिका फेटाळून लावत म्हटले की, "जा आणि देवाला स्वतःहून ते करायला सांगा. तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त असल्याचा दावा करता, म्हणून जा आणि त्यांची प्रार्थना करा." त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधाची मोठी लाट उठलेली. अनेकांनी सरन्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी केलेली.

पंतप्रधानांचा सरन्यायाधीश गवईंना फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सुप्रीम कोर्टात घडलेल्या घटनेबद्दल मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांच्याशी फोनवरून संवाद साधला. एका वकिलाने सुनावणीदरम्यान कोर्टात गोंधळ घातला आणि मुख्य न्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पंतप्रधानांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात जे घडलं, त्याबद्दल प्रत्येक भारतीय नागरिक नाराज आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना जागा नाही. अतिशय खेदजनक ही घटना आहे.” पंतप्रधानांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शांततेचे आणि संयमाचे कौतुक केले. अशा परिस्थितीत गवई यांनी दाखवलेले संयम आणि धैर्य न्यायव्यवस्थेच्या मूल्यांबद्दलची त्यांची निष्ठा दाखवते. हे आपल्या संविधानाच्या भावनेला अधिक बळकट करणारे आहे असं पंतप्रधान म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com