Atul Subhash: अतुल सुभाष प्रकरणी, पत्नीसह सासू अन् मेहुण्याला सुनावली न्यायालयीन कोठडी
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सध्या हॅशटॅग मेन टू ट्रेंडिंग होत आहे. मेन टू हॅशटॅगचा अर्थ पुरूषांना सुद्धा भोगावं लागतंय. पुरूष सुद्धा घरगुती मानसिक अत्याचाराचे बळी पडतात असा आहे. हा हॅशटॅग ट्रेंडिग का होत आहे, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा एका बंगळुरू स्थित उच्चशिक्षित पतीने दीड तास व्हिडीओ रेकॉर्ड करत आपली करूण कहाणी सांगत आपलं जीवन संपवलं आहे. एक्सवर शेअर केलं गेलेल्या ट्वीटच्या आधारे हे कळतंय की, बंगळुरू येथील 34 वर्षीय अतुल सुभाष या तरूणाने आपलं जीवन संपवलं आहे.
अतुल आणि त्याची पत्नी यांच्यातील वैवाहिक चांगले संबंध नव्हते. जौनपूर फॅमिली कोर्टात त्यांचं घटस्फोटाचं प्रकरण प्रलंबित होतं. त्यांच्या पत्नीने अतुलवर घरगुती हिंसाचाराविरोधात केस दाखल केली होती. एक्सवर शेअर केलेल्या पोस्टनुसार अतुल पत्नीला पोटगी म्हणून ४० हजार दरमहा रक्कम देत होता. मात्र, तरीही आणखी २-४ लाख अतिरिक्त पैशाची मागणी पत्नीने केली असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अतुल सुभाष हे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते. त्याची पत्नी सुद्धा एका प्रसिद्ध आयटी कंपनीमध्ये नोकरी करते.
तिघांनाही न्यायालयीन कोठडी
बेंगळुरू येथे कार्यरत एआय अभियंता अतुल सुभाष यांच्यासोबत घडलेल्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बेंगळुरू पोलिसांनी रविवारी अतुलची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया आणि मेहुणा अनुराग सिंघानिया यांना अटक केली. अतुलने आपलं मृत्यूसाठी पत्नी निकिता आणि सासरच्या मंडळींना जबाबदार धरले होते.पोलिसांनी निकिताला गुरुग्राममधून, तर सासू निशा आणि मेव्हणा अनुरागला प्रयागराज, यूपी येथून अटक केली आहे. न्यायालयाने तिघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.अतुलने ९ डिसेंबर रोजी आत्महत्या केली. सुमारे दीड तासाचा व्हिडिओ आणि 24 पानांची सुसाईड नोटही त्याने सोडली होती. यामध्ये अतुलने पत्नी व सासरच्या मंडळींवर बळजबरीने पैसे उकळून खोटे गुन्हे दाखल करून त्रास दिल्याचा आरोप केला होता.