'एकदम टोकाची भूमिका घेऊ नये' बच्चू कडू यांच
जरांगे पाटलांना आवाहन

'एकदम टोकाची भूमिका घेऊ नये' बच्चू कडू यांच जरांगे पाटलांना आवाहन

मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसींमध्ये आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
Published by :
shweta walge

मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसींमध्ये आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच, आपल्याला जीवे मारण्याचा कट रचला जात असून त्यामागेही देवेंद्र फडणवीस असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या आरोपांनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. यातच प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी यासंदर्भात मत व्यक्त करताना जरांगे यांना एक सल्ला दिला.

"एवढ्या दिवस ते आंदोलन करत आहेत. त्यांनी इतकी मेहनत केली आहे त्याला कुठेही डाग लागू देऊ नये. जरांगे पाटील यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. जरांगे पाटील असोत किंवा देवेंद्रजी असोत, कोणाचाही जीव महत्त्वाचाच आहे. हे आंदोलन कोणाच्याही जीवाशी संबंधित नाही. उलट या आंदोलनात आणखी चांगला मार्ग कसा काढता येईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. टोकाची भूमिका घेतली ही थांबवावी. कोणीही आंदोलनाला गालबोट लागेल असे करू नये. जरांगे पाटील हे एका गावापुरते मर्यादित नाहीत. त्यांनी खूप मोठे आंदोलन उभारले आहेत. आता असे निर्णय घेऊन त्याचे काही दुष्परिणाम झाले तर त्याचा चुकीचा संदेश जाईल. आतापर्यंत त्यांनी जे काही मिळवलंय ते पाहता त्यांनी शांततेचा मार्ग पुढेही सुरू ठेवावा," असा सल्ला बच्चू कडू यांनी जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, मराठ्यांचे आंदोलन संपवण्याचं कारस्थान फडणवीसांचे असल्याचे म्हणत आज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला. तसेच, काही लोकांना पुढे करुन मला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मला संपवण्याचे कटकारस्थान आहे. त्यामुळे, आता मीच मुंबईतील सागर बंगल्यावर येतो, असे जरांगे पाटील उपोषण स्थळावर बसून म्हणाले आणि तडक आपल्या जागेवरुन उठले अन् गाडीत बसून मुंबईकडे निघाले. रस्त्यात आंदोलनकर्ते सहकारी आणि काही मराठा समाजातील बांधव यांनी जरांगे यांनी कार अडवली. तब्येतीची काळजी घेण्यासाठी आधी उपचार घ्या, असे आग्रह त्यांनी धरला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com