Bacchu Kadu : बच्चू कडू यांचा शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला इशारा, म्हणाले...

Bacchu Kadu : बच्चू कडू यांचा शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला इशारा, म्हणाले...

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, त्यांनी नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली, या आंदोलनाला मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते, अखेर सरकारने या आंदोलनाची दखल घेतली.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे

  • शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडली,

  • सरकारने कर्जमाफीसाठी 31 जून 2026 ची डेडलाईन दिली

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, त्यांनी नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली, या आंदोलनाला मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते, अखेर सरकारने या आंदोलनाची दखल घेतली. बच्चू कडू यांना गुरुवारी बैठकीसाठी मुंबईमध्ये बोलावण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांची देखील उपस्थिती होती. या बैठकीमध्ये 6 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करू असा शब्द सरकारने बच्चू कडू यांना दिला आहे, त्यानंतर आता सरकारचा शब्द घेऊन बच्चू कडू यांचं पुन्हा एकदा नागपुरात आगमन झालं आहे. नागपूर विमानतळावर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारने घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं आहे, मात्र त्याचबरोबर सरकारला इशारा देखील दिला आहे.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालं आहे, शेतकऱ्यांच्या सहकार्याने आजचं यश हाती आलं आहे. आम्ही सरकारचं अभिनंदन करतोच आहोत, आम्ही सरकारचे आभार मानतो की, इतक्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेतला, या कठिण परिस्थितीमधून सरकारने मार्ग काढला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारच मानतो. परंतु हे सर्व करत असताना यामध्ये काही कट कारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही असा इशाराही यावेळी बच्चू कडू यांनी दिला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, 31 जून 2026 ही डेडलाईन दिली कर्जमाफीसाठी दिली आहे. त्याच्यामागे एक लॉजिक असं देखील आहे की, या वर्षीचा जो रनिंग कर्जदार आहे, हा 31 मार्च 2026 ला गठित होणार आहे, जर आता कर्जमाफीची घोषणा केली असतील तर असे कर्जदार यातून सुटले असते, ज्यामध्ये 2024- 2025 च्या कर्जदारांचा समावेश झाला असता. तारखेपासून पळणाऱ्या सरकारला तारखेवर आणलं. आंदोलन न करणारे आता कमेंट्स करतात. दगाफटका झाल्यास बच्चू कडू फासावर जाण्यासही तयार आहे, असं मोठं विधान यावेळी बच्चू कडू यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com